पुस्तक – ५९६० आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा (5960 Ani itar chittchakshuchamatkarik katha)
लेखक – इमॅन्युअल व्हिन्सेंट सँडर (Emanuel Vincent Sander)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १८७
प्रकाशन – सांगाती प्रकाशन, ऑगस्ट २०२३
छापील किंमत – रु. २७०/-
ISBN – 978-93-5768-417-0

“लोकसत्ता”च्या ५ नोव्हेंबर च्या लोकरंग पुरवणीत “निवडू आणि वाचू आनंदे” असा लेख आला होता. ज्यात अनेक नामवंत लेखक, पत्रकार, कलाकार ह्यांनी आपल्या आवडीची ५ पुस्तके दिली होती. त्यात हृषिकेश गुप्ते ह्या प्रसिद्ध लेखकाने दिलेल्या यादीत “५९६० आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा” हे पुस्तक होतं. नेटवर त्याबद्दल बघितलं तर फार माहिती मिळाली नाही. पण लक्षात आलं की पुस्तकाचा लेखक इमॅन्युअल माझ्या फेसबुक फ्रेंडलिस्ट मध्ये आहे. एक तरुण लेखक आहे. बहुधा हे त्याचं पाहिलंच पुस्तक. त्याच्याशी कधी थेट भेट किंवा चॅट पण कधी झालं नव्हतं. पुस्तकाचं नाव आणि त्याचा पाठमजकूर (ब्लर्ब) वाचून काहीतरी वेगळं, फँटसी, भीतीकथा अशा स्वरूपाचं लेखन आहे हे कळलं आणि उत्सुकतेने पुस्तक ऑनलाईन विकत घेतलं.

पृथ्वी, ग्रह, तारे ह्यांनी बनलेलं आपलं विश्व आहे. पण असं एकच विश्व नाही तर कितीतरी समांतर विश्व असतील. त्यात आपल्या सारखेच किंबहुना आपलीच प्रतिकृती असणारे लोक असतील. त्यांचं जीवन आपलं जीवन एकमेकांशी निगडीत असेल. काही दुष्ट शक्ती – “डार्क गॉड” ह्यांच्याकडे असीम ताकद असेल आणि ते दुसऱ्या विश्वातल्या जीवांचे आयुष्य नियंत्रित करू शकत असतील. महाबलाढ्य शक्तीधारी देव/राक्षस चित्रविचित्ररूपधारी जीव हे एकमेकांशी ह्या विश्वांच्या सत्तेवरून झगडत असतील. ते लोकांच्या मनात शिरून; त्यांना झपाटून एकमेकांचे खून करणं, त्रास देणं, आत्महत्या करणं ह्यासाठी प्रवृत्त करतील. ह्या जगातल्या सामान्य लोकांना आपल्याशी कोण खेळ खेळतंय, कठपुतळीसारखं नाचवतंय हे कळणार नाही. आणि मग काय काय “चित्तचक्षुचमत्कारिक” घटना घडतील… त्यांच्या ह्या गोष्टी.

पण… ही पूर्वपीठिका जितकी “चित्तचक्षुचमत्कारिक” आहे तितक्या ह्या कथा अजिबात नाहीत. कारण ह्या कथांमध्ये एखादा खून किंवा हत्या घडते. पण ती कशी घडते, त्याचं पुढे काय होतं, त्यातून महाशक्ती काय डाव साधतात हे चित्र उभं करण्याऐवजी लेखकाचा पूर्ण भर प्रसंगाची शब्दबंबाळ वर्णनं, एकमेकांशी संबंध नसलेले पात्रांचे संवाद, काहीतरी abstract वाक्यं (किंबहुना absurd वाक्यं); आजच्या पोरांची भाषा दाखवण्यासाठी “XXX” ऐवजी थेट शिव्या, लैंगिक क्रियांचा विनाकारण तपशील दाखवून बोल्डनेस आणण्याचा प्रयत्न असला सगळा फापटपसारा आहे. बरंच काही लिहायचं आहे, बरंच काही लिहिलं सुद्धा आहे पण वाचकाला काही पत्ता लागला नाही पाहिजे; त्याने हवे असल्यास काही कथाबिंदू गोष्टी लक्षात ठेवावेत आणि जमलं तर आपला आपण अर्थ काढावा; असला वेडगळपणा आहे.

काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका

दुसरे विश्व आणि त्यातल्या शक्तींचा परिणाम अशी वातावरण निर्मिती करणाऱ्या सुरुवातीच्या मोजक्या काही पानांपैकी


दुसऱ्या गोष्टीत कॉलेजमधली मुलं एकांकिका बसवतायत तो प्रसंग. (काही कळलं तर मला सांगा)


हे वर्णन “बोल्ड” का शृंगारिक का ओंगळ हे ज्याचं त्याने ठरवावं. ह्या खास वर्णनाने कथा काही पुढे गेली असेल असं मला वाटलं नाही 

पहिल्या दोन गोष्टी मी प्रामाणिकपणे नीट वाचल्या. लेखक जी कल्पना करतोय ती मनात ठसत नसली तरी ती तशी आहे हे धरून वाचल्या. त्यानंतरच्या कथेत जे भरताड होतं ते भराभर वाचलं. पण ना शेंडा-ना-बुडखा. मग पुढच्या गोष्टी वरवर वाचल्या. त्यातही हाच पाणचटपणा बघून पुस्तक पुढे वाचणं म्हणजे वेळ फुकट घालवणं आहे असंच वाटत राहिलं. ह्या सगळ्या कथा स्वतंत्र असल्या तरी एकमेकांशी निगडीत आहेत असं म्हटलं आहे. म्हणून “रोचक शेवटच” थेट वाचूया म्हणजे रहस्य तरी कळेल असं वाटलं. मग पुस्तक उलटं वाचायचा प्रयत्न केला. “तरी बी न्हाईच !”
एकूण ही लक्षणं “मानाचे साहित्यिक पुरस्कार” मिळलेल्या पण मला बंडल वाटलेल्या पुस्तकांशी जुळणारी दिसली (गॉड ऑफ स्मॉल थिंग्स, रेत समाधी, व्हाईट टायगर, हिंदू इ.). त्यामुळे येत्या काही महिन्यांत ही पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध कादंबरी झाली तर मला नवल वाटणार नाही.

हे पुस्तक तुम्ही वाचावं असं मी सुचवणार नाही. पण वरचं वर्णन वाचून तुम्हाला वाचावंसं वाटलं किंवा तुम्ही आधीच वाचलं असेल तर तुमचा अभिप्राय मला सांगा. माझ्या डोक्यावरून हे पुस्तक गेलंय पण तुम्हाला समजलं तर मला समजावून सांगा; निराळ्या पद्धतीने हे पुस्तक वाचलं पाहिजे का हे समजावून सांगा.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर कथासंग्रहांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

 

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe