पुस्तक – गोल्पे विभोर (Golpe Vibhor)
लेखिका – बाणी बसू (Bani Basu)
अनुवादक – सुमती जोशी (Sumati Joshi)
भाषा – मराठी (Marathi)
मूळ पुस्तकाची भाषा – बंगाली
पाने – १९२
प्रकाशन – रोहन प्रकाशन, सप्टेंबर २०२३
छापील किंमत – २७५ /- रु.
ISBN – 978-93-92374-89-0

बाणी बसू लिखित बंगाली कथासंग्रहाचा हा मराठी अनुवाद आहे. बाणी बसू ह्या प्रथितयश बंगाली लेखिका आहेत. त्यांची आणि अनुवादिकेची पुस्तकात दिलेली माहिती वाचून घ्या.

सुखवस्तू, मध्यमवर्गीय कुटुंबात घडणाऱ्या किंवा घडू शकतील असे प्रसंग, नातेसंबंध, मानवी भावभावनांची नाना रूपे ह्यांच्या भोवती कथा गुंफलेल्या आहेत. प्रत्येक कथा वेगळी आहे. त्यामुळे पुस्तक थीमबेस्ड असं नाहीये. गोष्टी विनोदी नाहीत किंवा खूप रडक्या सुद्धा नाहीत. वाचायला मजा येते आणि शेवट काहीसा अनपेक्षित असा होतो. पण तो अशक्य किंवा अतर्क्य अशा प्रकारात जातात नाही; त्यामुळे “हं… असंही होऊ शकतं” अशा भावना मनात येतात.
प्रत्येक कथेबद्दल थोडक्यात सांगतो.

१) निळ्या रंगाचा चुडीदार – एका घरात दोन शाळकरी मुली आहेत. एक घरमालकाची मुलगी आणि दुसरी घरातली मोलकरीण. घरची गृहिणी मोलकरीण मुलीच्या वयाची जाणीव ठेवून चांगलं वागवते आहे. तरी घरातली मुलगी आणि नोकराणी ह्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये फरक तर पडणारच. आपली आई नोकराचं जास्त कौतुक करते असा मुलीचा आरोप असतो. तर मालकिणीच्या मुलीशी नोकर मुलीची स्पर्धा चालू असते. लहानपणाचे हे हेवेदावे पुढे काय वळण घेतात.
२) साळींदराचं गूढ – एका डॉक्टरकडे एक इमर्जन्सी केस येते. माणूस पूर्ण रक्तबंबाळ. पूर्णपणे काट्यांनी टोचल्यासारखा. उपचारांचा उपयोग होत नाही. काही दिवसांनी अजून एक केस. हळूहळू गावोगावी अशा घटना वाढत जातात. मारणारा माणूस म्हणतो साळींदराने हल्ला केला. पण साळींदर कोणाला दिसत नाही. भरवस्तीत सुद्धा झालेल्या मृत्यूत हीच लक्षणे. काय आहे हा प्रकार ? त्यासाठी गोष्ट वाचाच.
३) झिरो कॅपिटल – पारंपरिक लोखंडाचा, भंगाराचा मोठा व्यवसाय असणाऱ्या घरातली पुढची पिढी आता वेगळ्या पद्धतीने धंदा करू पाहतेय. शून्य गुंतवणुकीतून जास्त नफा कमावण्याचा फसवणुकीचा मार्ग कसा यशस्वी होतो. कोणाचा फायदा तर कोणाचं आर्थिक आणि भावनिक नुकसान.
४) लाडाची झुपली – एक वृद्ध जोडपं आयुष्यातला एकटेपणा, कंटाळलेपणा घालवण्यासाठी कुत्र्याचं पिल्लू पाळतात. जणू घरात नवं बाळच येत. दिसामाशी वाढू लागत. मोठं होतं. “मुलं मोठी झाली, त्यांना शिंग फुटली”की जे होतं ते इथेही झालं तर… हे चित्रित करणारी हृद्य गोष्ट आहे.
५) पिसिमा आत्याई – वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची चारपाच मुलं एकत्र जमली आहेत. संपत्तीची वाटणी तर होईलच पण वडिलांच्या वृद्ध बहिणीचा – आत्याईचा – सांभाळ कोणी करायचा ? त्याच्या नफ्यातोट्याची गणितं !
६) विकल्प की अविकल्प – एक सुतार आपल्या कामातले बारकावे एका तरुण मुलीला समजावून सांगतोय. जणू जीवनाचं तत्त्वज्ञानच सांगतोय.
७) जातीचा गर्व – दोन शेजारी मुलांमधली भांडणं आणि त्यात अनपेक्षितपणे डोकावणारी जात.
८) भविष्यातली एंजल सिटी – ही एक कल्पनारम्य (फँटसी) कथा आहे. भविष्यात कधीतरी असं घडतं आहे की .. अमेरिकेसारख्या लांबवरच्या एंजल सिटीतले तरुण पुन्हा एकदा दुर्गापूजा साजरी करतायत जुने व्हिडीओ, जुनी डॉक्युमेंट्स बघून मूर्ती आणि प्रथांचा अर्थ लावायचा प्रयत्न करतायत. कसा विचार करतील ते !
९) विझून गेलेली चंद्रकोर – दुसऱ्याचं दुःख बघून कळवळणारी, रस्त्यावरच्या अनोळखी माणसांना मदत करायला धावणारी बायको सुरुवातीला हळव्या मनाची प्रेमळ वाटली होती. पण “अति झालं” की तेही त्रासदायकच. त्याचा उपाय जर आणखी त्रासदायक झाला तर.
१०) उपेक्षित गंगाजल – दुसऱ्या जातीची असल्यामुळे नव्या सूनबाईचं स्वागत सासरी फार मनापासून झालं नाही. पण शेजारच्या आदरणीय ब्राह्मण आजोबांनी तिचे उच्चशिक्षण आणि चांगली वागणूक बघून तिला मानाने वागवायला सुरुवात केली. मग त्याचा परिणाम सासरच्यांवर होईल का ? हा मान कायमस्वरूपी राहील का ?
११) प्रेमातली रिस्क – नाकासमोर चालणारा तरुण. आणि अनपेक्षितपणे त्याला करतंय कोणीतरी “प्रपोज”. घेईल का तो “हो” म्हणण्याची “रिस्क”
१२) शमलेली शलाका – कॉलेज तरुण तरुणींचं एकतर्फी प्रेम, नकार, त्याचा सल आणि अनेक वर्षांनी पुन्हा एकदा गाठ.

काही गोष्टींची पानं वाचा म्हणजे लेखनशैलीची, अनुवादाची कल्पना येईल

“साळींदराचं गूढ” मधील एक प्रसंग

“उपेक्षित गंगाजल” मधील एक प्रसंग


“विकल्प की अविकल्प” मधील संवाद

अशा ह्या १२ गोष्टी. कथांचा रहस्यभेद न करता थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे. “साळींदराचं गूढ” , “लाडाची झुपली”, “उपेक्षित गंगाजल” विशेष आवडल्या. “विकल्प की अविकल्प” मधला शेवट समजला नाही. तर “जातीचा गर्व” अर्धवटच संपली आहे असं वाटलं. बाकी गोष्टींचे विषय फार भारी असे नाहीत पण वाचायला रंजक आहेत. व्यक्ती आणि प्रसंग वर्णनं उत्सुकता वाढवणारी आहेत. योग्य शब्दांत वर्णन आहे, फापटपसारा नाही.

ह्या आधी मी ज्या बंगाली गोष्टी वाचल्या होत्या त्या रवींद्रनाथ किंवा त्याकाळातील लेखकांच्या होत्या. त्यामुळे बंगाली गोष्ट म्हटल्यावर १०० वर्षांपूर्वीचा बंगाल डोळ्यांसमोर ठेवून मी वाचायला सुरुवात केली आणि एकदम आधुनिक उल्लेख आल्यावर लक्षात आलं की ह्या चालू काळातल्या गोष्टी आहेत. मग एक फरक जाणवला कि जुन्या गोष्टींतून जसा त्यावेळच्या बंगालचं चित्र एक चित्र – धूसर का होईना – पण उभं राहत होतं. तेव्हाचा निसर्ग, खास जीवनपद्धती, समाजव्यवस्था समजत होती. तसं ह्या पुस्तकात झालं नाही. “बंगाली गोष्टींमधला बंगाल” बघण्याच्या माझ्या पूर्वग्रहामुळे माझा थोडा हिरमोड झाला. तसं म्हटलं तर ही जमेची बाजू आहे. वर्णनात थोडाफार फरक करून ह्याच गोष्टी पुणे, मुंबई, मद्रास, कुठेही दाखवता आल्या असत्या. कारण हे लिखाण “प्रांत-संकुचित”नाही. कुठलाही रसिक त्याच्याशी जोडून घेऊ शकतो.

बहुतांश अनुवाद चांगला झाला आहे. काही काही ठिकाणी अगदी शब्दश: भाषांतर झालं आहे. आमच्या गल्लीतले किंवा आमच्या परिसरातले लोक म्हणण्याऐवजी “पाड्यातले” लोक असा उल्लेख आहे. कदाचित हा शब्द बंगालीत वापरला जात असावा. पण मराठीत आपण “पाडा” म्हटलं कि “आदिवासी पाडा”, गावाबाहेरची छोटी वस्ती असं दृश्य समोर येतं. पण इथे शहरांतलं वर्णन आहे. “मुखर्जी गृहिणीने लोकरीचा गोळा उचलला”. असं वाक्य आहे. “मुखर्जी गृहिणी” ? त्या ऐवजी “सौ. मुखर्जींनी” किंवा “मुखर्जीबाईंनी” असं जास्त चांगलं वाटलं असतं का ? बंगाली लोक एकेमेकांना टोपणनावाने फार हाक मारतात. पण आपल्याला त्याची सवय नसल्यामुळे हे कोण नवीन पात्र गोष्टीत आलं असा गोंधळ क्षणभर उडतो. एका गोष्टीत “बुढीमाची आठवण आली” असं वाचल्यावर त्या बाईंना आपल्या आईची, आजीची आठवण आली असेल असा माझा समाज झाला. पण पुढे वाचत राहिल्यावर कळलं. त्यांच्या लहान मुलीचं हे टोपणनाव आहे! काही तळटीप देऊन किंवा अनुवादस्वांतत्र्य घेऊन “गंपू, चंपू, गोट्या, राजू” अशी आपल्या सवयीची टोपणनावं वापरता आली असती का 😄? आणि हो, गंमत म्हणजे “गोल्पे विभोर” म्हणजे काय हे काही पूर्ण पुस्तकात कळलं नाही.

तर असं हे पुस्तकाचं एकूण स्वरूप आहे. इतर भाषांतले प्रसिद्ध लेखन कसं आहे हे समजून घ्यायला चोखंदळ वाचकांना नक्की आवडेल.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर कथासंग्रहांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

 

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe