पुस्तक – समर्थांची लेक (Samarthanchi lek)
लेखिका – सारिका कंदलगांवकर (Sarika Kandalgaonkar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १९९
प्रकाशन – संवेदना प्रकाशन, एप्रिल २०२४
ISBN – 978-81-1973783-3
छापील किंमत – रु. ३००/-
हे पुस्तक मला वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम लेखिका सारिका कंदलगांवकर ह्यांचे मी आभार मानतो !
गीतरामायणाल्या “दैवजात दुःखे भरता” गाण्यात ओळ आहे “मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा”. मृत्यू म्हणजे काय? मृत्यूनंतर काय होते? हे कोणी स्वानुभवाच्या आधारे जाणून घेऊ शकत, म्हणून “तर्क” थांबतो…पण माणूस त्याबद्दल विचार करणं, कल्पना करणं थांबवत नाही. म्हणूनच या गीताच्या ओळीचा व्यत्यास असा की “मरणकल्पनेशी रंगे खेळ कल्पनांचा “. वेगवेगळ्या धर्मात, पंथात मृत्यूनंतरचं जीवन ह्याबद्दल वेगवेगळ्या कल्पना आहेत; आपापली एक विचारपद्धती आहे. त्यातलीच एक आहे की मृत्यूनंतर आत्मा राहतो. जर माणसाच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर तो आत्मा भटकत राहतो. इच्छा पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करतो. जर अन्याय-अत्याचार-फसवणूक ह्यामुळे मरण आलं असेल तर तो आत्मा सूड घ्यायचा प्रयत्न करतो. तंत्र-मंत्र विद्येतून अशा आत्म्यांना वश करून घेता येतं. आत्म्याच्या अचाट शक्तीचा वापर करून घेऊन गुप्तधन मिळवणे, इतरांवर हुकूमत गाजवणे असे सुद्धा जमू शकते. तर इतर पूजापाठ, मंत्र-तंत्र वापरून ह्या भटकणाऱ्या आत्म्यांना मुक्ती मिळू शकते. त्यामुळे आत्मा, भूत, अतृप्त आत्मा, मांत्रिक, जादूटोणा, वशीकरण हे सगळे आपल्या परिचयाचे शब्द. भयपट, भयकथा ह्यांमधले परवलीचे शब्द. ह्याच शब्दांशी, त्यातून तयार होणाऱ्या अद्भुत कथानकाची गुंफण म्हणजे “समर्थांची लेक” ही कादंबरी.
ह्या कादंबरीची नायिका आहे एक युवती – अक्षता. तिच्या घराण्यात दत्तप्रभू, नाथसंप्रदाय ह्याची उपासना चालत आली आहे. त्यातून ह्या घराण्यातल्या व्यक्तींना सिद्धी प्राप्त झाली आहे की ते अतृप्त आत्म्यांना बघू शकतात. मंत्र, भस्म, गंगाजल वगैरे विधींचा वापर करून ते ह्या आत्म्यांना कायमची मुक्ती देऊ शकतात. तरुण अक्षता सुद्धा तिच्या सिद्धींचा वापर चांगल्यासाठी करते आहे. एखाद्या ठिकाणी अनाकलनीय घटना घडत असतील, माणसं अचानक मरत असतील किंवा एखादी जागा भुताने झपाटलेली असं कळलं की कोणाच्या नकळत तिकडे जाते. मग ते भटकणारे – सूडाने पेटलेले आत्मे तिच्यावर हल्ला करायचा कसा प्रयत्न करतात आणि ती त्यातून सहीसलामत कशी सुटते आणि आत्म्यांनाही मुक्ती देते ह्याचे अद्भुतरम्य प्रसंग पुस्तकात आहेत.
हे प्रसंग घडताना “पूर्वदृश्य” तंत्राचा वापर करून एक समांतर कथानक आपल्यासमोर उभं राहतं की ; तिचे आजोबा, वडील सुद्धा अशा प्रसंगांना कसे सामोरे जात होते. त्यांचे गुरु त्यांना दृष्टांत देत, तर कधी मंत्राची शक्ती. कधी दोन जादूगारांच्या लढाईप्रमाणे आत्म्याबरोबर लढाई, दोन मांत्रिकांची लढाई वगैरे. आपल्या शक्तीचा चांगल्यासाठी वापर करणारे अक्षताचे घराणे. तर त्यांना स्पर्धक म्हणजे ह्या शक्तीचा कपाटासाठी, ऐहिक स्वार्थासाठी वापर करणारी दुसरी टोळी. सुष्ट-दुष्टांच्या ह्या लढाईत हत्यारं आहेत – आत्मे, मंत्रतंत्र, अद्भुत शक्ती. ह्या लढाईत काय प्रसंग घडतील, कोण कोणाला कसा शह देईल, शक्तींची लढाई कशी होईल ह्या सगळ्या वर्णनातून साकार झाली आहे “समर्थांची लेक”.
काही प्रसंग वाचा म्हणजे लेखिकेच्या शैलीची कल्पना येईल.
एका बाईचं बाळ तिच्यापासून हिरावून घेतलं होतं. त्या बाईचं भूत आता इतर लोकांना त्रास देत होतं. त्याबद्दलचा एक प्रसंग.
भुताखेतांवर ताबा मिळवण्याची अद्भुत शक्ती गुरु आपल्या शिष्यांना देत. अमर नावाच्या एका पात्राच्या शिक्षणावेळचा एक अद्भुत प्रसंग.
ज्यांना भयपट किंवा अशा पद्धतीच्या कादंबऱ्या आवडतात त्यांना ही कादंबरी आवडेल. मला ही अद्भुतता विशेष रंजक वाटत नाही. सुरुवातीला म्हटलं तसं “तर्क थांबवूनच” मृत्युपश्चातच्या जीवनाची कल्पना करावी लागते. त्यामुळे असे लेखन म्हणजे लेखिकेने स्वतः उभारलेले विश्व. ती म्हणेल ते नियम. त्यामुळे काही वेळा अचाट शक्ती असणारी पात्र आजूबाजूचं जग स्तब्ध करतात, अंतर्ज्ञानाने सगळं जाणतात, मेलेल्याला जिवंत करतात पण तीच पात्र मध्येच हतबल होतात, “जे होणार आहे ते होणारच” असं म्हणतात; “आपण कोणाचा जन्म आणि मृत्यू बदलू शकत नाही” असं म्हणतात. ते मला सुसंगत वाटत नाही. काही वेळा, पुढे काय होणार आहे हे त्यांना दिसतं आणि काही वेळा ते भविष्यच बदलायचा प्रयत्न करतात. काही वेळा आत्म्याची शक्ती येते; काही वेळा जाते. असं खूप गोंधळात टाकणारं चित्रण आहे. ह्या कादंबरीतच नाही पण एकूणच भयपट, भुताच्या गोष्टी किंवा “सुपर ह्युमन फँटसी” प्रकारचे हॉलिवूड चित्रपट ह्यामध्ये पण गोंधळ नेहमी दिसतो. त्यामुळे थोडे प्रसंग वाचायला मजा येते पण पुढेपुढे ते एकसुरी आणि न जुळणारे वाटतात. ही कादंबरी पण त्याला अपवाद नाही. त्यामुळे मी खूप आनंद घेऊ शकलो नाही.
तुम्हाला भुताच्या गोष्टी मनापासून आवडत असतील तर कादंबरी वाचून बघा.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
रहस्यकथा, भयकथा, कल्पनारंजक कथानक असणाऱ्या इतर काही पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- ५९६० आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा (5960 Ani itar chittchakshuchamatkarik katha) – इमॅन्युअल व्हिन्सेंट सँडर (Emanuel Vincent Sander)
- अंधारवारी (Andharvari) – हृषिकेश गुप्ते (Hrushikesh Gupte)
- काजळमाया (Kajalmaya) – जी.ए. कुलकर्णी (G.A. Kulkarni)
- काफ्काचं ‘मेटॅमॉर्फोसिस’ – न संपणारं गारुड (Kafkacha ‘metamorphosis’ na sampanara garud) – डॉ. सुहास भास्कर जोशी (Dr. Suhas Bhaskar Joshi)
- निळ्या दाताची दंतकथा (Nilya Datachi Dantakatha) – प्रणव सखदेव (Pranav Sakhadeo )
- पाचूचे बेट (Pachuche Bet) – हर्मन मेलव्हिल (Herman Melville) – अनुवाद – भानू शिरधनकर (Bhanu Shirdhankar)
- प्लँटोन (Planton) – डॉ. संजय ढोले (Sanjay Dhole)
- मनोवेधस (Manovedhas) – चंद्रशेखर गोखले (Chandrashekhar Gokhale)
- मस्रा (Masra) – बेन्यामिन (Benyamin) अनुवादक – ए. आर. नायर / जे.ए. थेरगांवकर (A. R. Nair, J.A.Therganonkar)
- रंगांधळा (Rangandhala) – रत्नाकर मतकरी (Ratnakar Matakari)
- शिन्झेन किस (Shinzek Kiss) – शिन्इची होशी Shinichi Hoshi – अनुवादक – निस्सीम बेडेकर (Nissim Bedekar)
- The housemaid (द हाऊसमेड) – Freida McFadden (फ्रीडा मॅकफॅडन)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या तीनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe