पुस्तक – त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers)
लेखक – इतो ओगावा (Ito Ogawa)
अनुवाद – मयुरेश कुलकर्णी (Mayuresh Kulkarni)
भाषा – मराठी (Marathi)
मूळ पुस्तक – ツバキ文具店 (त्सुबाकी बुंगुतेन) Tsubaki Bunguten
मूळ पुस्तकाची भाषा – जपानी (Japanese)
प्रकाशन – कलासक्त. ऑगस्ट २०२५
छापील किंमत – रु. ५५०/-
ISBN- 978-81-944022-7-5
सध्याच्या संपर्कक्रांतीच्या जगात व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून क्षणार्धात पृथ्वीवरच्या दुसऱ्या टोकावरच्या माणसाला बघून त्याच्याशी बोलता येतं. काही माहिती पाठवायची असेल तर व्हॉट्सअप, ईमेलद्वारे ती तात्काळ पाठवता येते. दुसऱ्याला मेसेज पोचले की नाही, त्याने वाचले की नाही हे सुद्धा समजते. त्यामुळे पूर्वीसारखं एकेमेकांना पत्र लिहायचं प्रमाण फारच नगण्य झालं आहे. तरीही ज्यांनी पूर्वी पत्र लिहिली आहेत त्यांना ते जुने दिवस आठवतात. गंमत अशी झाली आहे की; पत्र ह्या माध्यमाच्या मर्यादाच आता त्या माध्यमाची वैशिष्ट्य वाटतात. ईमेल आपण टाईप करतो, पत्र हाताने लिहितो. लिहिणाऱ्याचा वैयक्तिक स्पर्श त्याला असतो. ईमेल कितीही मोठा लिहू शकतो, कितीही मोठी अटॅचमेंट पाठवू शकतो. पण हाताने पत्र लिहिताना मजकुराला काही मर्यादा पडतात. दोन-तीन पाने लिहिली तरी किती मोठं पत्र लिहिलं आहे असं वाटणार. त्यामुळे कमी जागेत, कमी शब्दांत जास्तीत जास्त माहिती, मजकूर, भावभावना प्रभावीपणे मांडणे आवश्यक होते. लिहिणाऱ्याच्या विचारांचा, शब्दांचा तिथे कस लागतो. शब्दांव्यतिरिक्त पत्राचा कागद, त्यावरची नक्षी, सजावट, हस्ताक्षरातले बदल, त्यात काढलेली चित्र , रेघोट्या, पत्राबरोबर पाठवलेलं एखादं फूल, सुगंधाचा थेंब ह्यातून “शब्देविण संवादु”ही करता येतो. असं मनापासून लिहिल्यावर ते कधी पोचेल, वाचणाऱ्याला काय वाटेल, तो काय उत्तर देईल, त्याचं उत्तर कधी येईल ह्याची वाट बघावी लागते. “त्वरित प्रतिसादाच्या” instant gratification च्या जमान्यात असे वाट बघणे, झुरणे सुद्धा आपण विसरलो आहोत ते पुन्हा मिळवल्याचा अनुभव येईल.
पत्रलेखनाच्या ह्या वैशिष्ट्यांची जाणीव असणाऱ्या व्यक्तींभोवती फिरणारी ही कादंबरी आहे. जपानमध्ये टोकियोपासून जवळ असणाऱ्या कामाकुरा गावात घडणारी ही ही गोष्ट आहे. कमाकुरा अगदी खेडेगाव नाही पण खूप मोठे शहरही नाही. तिथल्या जुन्या मंदिरांमुळे ते पर्यटकांनाही भुरळ घालणारे समुद्राकाठचे छान गाव आहे. या गावात “त्सुबाकी स्टेशनर्स” नावाचं स्टेशनरीचं दुकान आहे. दुकान चालवणारी तरुण हातोको अमेमिया काही वर्षे परदेशात राहून आता जपानला परत आली आहे. दुकानाच्या वरच तिचं घर आहे. पूर्वी तिची आजी आणि ती तिथे राहायचे. पण काही महिन्यांपूर्वी तिच्या आजीचं निधन झाल्यानंतर ती पुन्हा जपानला आली आणि हे दुकान चालवायला लागली आहे. कागद, पेन्सिल, पेनं शालेय वस्तू दुकानात मिळतातच पण पत्रलेखन हे ह्या दुकानाचे वैशिष्ट्य आहे.
कामापुरा गावातल्या लोकांना आपल्या नातेवाईकांना, सहकाऱ्यांना, मित्र-मैत्रिणींना काही खास प्रसंगी पत्रच लिहाविशी वाटतात. वर म्हटल्याप्रमाणे, फोन ई-मेल यापेक्षा पत्रातून आपल्या भावना चांगल्या पोचतील असं त्यांना वाटतंय. पण पत्रलेखनाची सवय गेली असल्यामुळे म्हणा, भाषेवर तितकं प्रभुत्व नाहीये म्हणा किंवा अगदी हस्ताक्षर चांगलं नाही म्हणा अशा कारणांमुळे त्यांना ते पत्र स्वतः लिहायचं नाहीये. ते कोणाकडूनतरी लिहून घ्यायचे आहे. हे काम करायची हातोकोची आजी. पत्रलेखन करून घेणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, व्यक्तिमत्व कसं आहे, पत्र कोणाला पाठवायचं आहे, पत्रातून राग, लोभ, ताटातूट, विरह अशा कुठल्या भावना व्यक्त करायची आहे हे सगळं लक्षात घेऊन प्रत्येक पत्राला स्वतंत्र, अनोखं करण्याचा तिच्या आजीचा प्रयत्न असायचा. त्यामुळे त्या त्या प्रसंगाला साजेसा कागद, रंग, शाईचा कमीअधिक गडदपणा, पत्राची नक्षी, पत्राला लावायचा स्टॅम्प, पत्र घालायचा लिफाफा, हे सगळं सगळं वेगवेगळं असायचं. त्सुबाकी स्टेशनर्स कामाकुराच्या लोकांमध्ये जिव्हाळ्याचं होतं . ही कला आपल्या नातीतही उतरावी अशी आजीची मनापासून इच्छा होती. त्यामुळे लहानपणापासून हातोकोकडून चांगली अक्षरं गिरवून घेणं, पत्रलेखनाचे सर्व नियम सोपस्कार व संकेत तिने घटवून घेतले होते. आजीच्या माघारी हातोको आता पहिल्यांदाच स्वतंत्रपणे या कामात उतरलीये. आता तिला कोण कोण व्यक्ती भेटतात आणि किती वैशिष्ट्यपूर्ण पत्र तिला लिहावी लागतात याची ही गोष्ट आहे.
दुसरी एक व्यक्ती येते. तिला तिच्या तरुणपणीच्या प्रेयसीला पत्र पाठवायचं असतं. तो आणि ती दोघेही आता आपल्या संसारात रमले आहेत. परत एकत्र भेटण्याची शक्यता नाही. पण तरीही एकदा नुसती आठवण जगवायची इच्छा आहे. हे पत्र प्रेमपत्र वाटता कामा नये. माझ्या प्रेयसीच्या संसारात त्याने काही खळबळ माजू नये. आपल्या भावना तिच्यापर्यंत तरी पोचाव्यात. अतिशय तरल आणि कठीण कामगिरी हातोकोवर येते.
असे बरेच प्रसंग या कादंबरीत येतात. प्रत्येक वेळी ती कसा विचार करते, कुठले शब्द वापरते, कशी वाक्यरचना करते, कुठला कागद घेते, अक्षर कसं काढते, पेन शाई कशी निवडते हे सगळं वर्णन वाचत वाचत कादंबरी रंगते. पत्रलेखनाचे किस्से हा कथानकाचा एक भाग आहे. हातोकोचे आणि तिच्या आजीचे संबंध हा कादंबरीच्या प्रसंगांच्या पार्श्वभूमीवरती येणारा धागा आहे. हातोकोला तिची आजी एकटीने वाढवतेले आहे. हातोकोचे आई-वडील कोण हे आजीने तिला कधी सांगितलं नाही. आजही हातोको पत्रलेखन करत असली तरी लहानपणी जेव्हा आजी तिला शिस्त लावत होती, इतर मुलांप्रमाणे मजा करू न देता सतत अक्षर सुधारायचा सराव करायला लावत होती ते तिला आवडत नव्हतं. हळूहळू आजीबरोबर तिचे संबंध कटू होत गेले. ताणले गेले. ती आजीला सोडून परदेशी गेली. आजीच्या माघारी पत्रलेखन करायचं ठरवल्यावर तिला पदोपदी आजीने शिकवलेल्या गोष्टी आठवतात. आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्यातून आजीबद्दलच्या काही गोष्टी कळतात. आपल्या ग्राहकांच्या भावना शब्दात मांडताना ती स्वतःच्या भावनांचाही नकळत विचार करते . आजीच्या आणि तिच्या नात्याचा पुन्हा पुन्हा विचार करते.
पत्रलेखनाच्या कामातून तिची काही वैशिष्ट्यपूर्ण लोकांशी ओळख होते. मैत्री होते. शेजारणीशी मैत्री होते. त्यांच्या गप्पा, कामाकुरात फिरणं, हॉटेलिंग करणं ह्यातून कामाकुरा गाव, तिथली शांतता, स्वच्छता, निसर्गसौंदर्य, जुनी मंदिरं, चेरीब्लॉसम प्लमब्लॉसम सारखी निसर्गाची लोभसवाणी रूपं, तिथली जीवनपद्धती हे सगळं नेपथ्य उभं राहतं. हे सगळं कादंबरीला आणि कथानकाला पोषकच आहे.
कादंबरी हळूहळू उमलत जाणाऱ्या फुलाप्रमाणे हातोकोचं व्यक्तिमत्व, तिचा भूतकाळ, तिच्या आजीचं व्यक्तिमत्त्व थोडं थोडं उलगडत एका सुंदर वळणावर येऊन पूर्ण होते. पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले तसं नवरसांपैकी शांतरस हे या कादंबरीचं वेगळेपण आहे. कादंबरीत कुठेही फार मोठं नाट्यमय, धक्कादायक असं काही घडत नाही, तरी प्रत्येक पानात काही ना काही घडत असतंच. एकाच प्रसंगाचं विनाकारण तपशीलवार वर्णन करून पानंच्या पान भरली आहेत असंही नाही. पत्रलेखनाच्या कामातून वेगवेगळे किस्से आपल्यासमोर येतात. पण कुठलाही किस्सा ताणलेला नाही. पत्र सांगणाऱ्या व्यक्तीचे वर्णन, हातोकोची निवड प्रक्रिया आणि पत्राचा झालेला परिणाम असं समजून कथानक पुढे सरकतं. एखाद्या शांत जलप्रवाहात लहान नाव वल्हवत वल्हवत आपण आपल्याच गतीने हळूहळू पुढे सरकावं, आजूबाजूची दृश्य बघावी त्यापद्धतीच्या शांततेचा निवांततेचा अनुभव हे पुस्तक आपल्याला देतं. जपानी संस्कृती, तिथली खाद्यपद्धती, मंदिरं, पत्रलेखनाचे नियम व संकेत या गमतीजमतीही आपल्याला वाचायला मिळतात.
मयुरेश कुलकर्णी यांनी थेट जपानीतून मराठीत याचं भाषांतर केलं आहे. इंग्रजी पुस्तकावरून नाही. भाषांतर अप्रतिमच झालं आहे. फक्त मजकूरच नाही, तर नायिकेने लिहिलेल्या पत्रांमधली शब्दरचनासुद्धा त्या त्या पत्राला साजेशी अशी वेगळी वेगळी ठेवण्यात मयुरेशने यश मिळवलं आहे. वर्णनात जपानची भूमी आणि शब्दांत मराठी माती असा मिलाफ सुंदर जमला आहे.
काही पाने उदाहरणादाखल
लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती.

सासूबाईंना साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्र लिहा.



नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या वेगळ्या समजुती


कथानकात आलेल्या पत्रांमध्ये हातोकोने काय लिहिले याच बरोबरीने, कसं हस्ताक्षर काढलं आणि सरतेशेवटी ते पत्र कसं दिसलं हे समजणंसुद्धा वाचकासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे मूळ पुस्तकात जपानी हस्तलिखित पत्रांचे फोटो छापले आहेत. मयुरेशने सुद्धा देवनागरी लिपी वेगवेगळ्या पद्धतीने लिहून त्या पत्रांचे फोटो छापलेले आहेत. पुस्तक निर्मितीत, पुस्तक छपाईत हा एक वेगळाच प्रयोग आहे. मराठीतही उत्तमपणे साधला गेला आहे
कथाबीज, कथा घडते ती जागा व तिथली संस्कृती आणि कादंबरीचा बाज या सगळ्यातच, नेहमी वाचायला मिळणाऱ्या मराठी किंवा अनुवादित पुस्तकांपेक्षा खूप वेगळेपणा आहे. वैशिष्ट्य आहे. मराठी वाचकांसाठी हा अनुभव मराठीत आणल्याबद्दल एक वाचक म्हणून आणि मराठी भाषा प्रेमी म्हणून मयुरेशचे व प्रकाशकाचे मनापासून आभार मानतो.
मयुरेशची पुस्तकात दिलेली माहिती

फेसबुक वर तृप्ती कुलकर्णी यांनी पोस्ट लिहून या पुस्तकाचा परिचय करून दिला होता. नंतर तन्वी राऊत हिने लिहिलेला परिचय मी वाचला होता. ते दोन्ही परिचय वाचून पुस्तक वाचायची इच्छा निर्माण झाली. पुस्तक विकत घेतलं आणि ते आवडलं. म्हणून तृप्तीजी आणि तन्वी यांचेही आभार. तृप्ती कुलकर्णी चालवत असलेल्या ऑनलाइन मुलाखती आणि सादरीकरण्याच्या उपक्रमात मागच्या महिन्यात मयुरेशची मुलाखत घेण्यात आली (Youtube link https://www.youtube.com/watch?v=IacLsc72JGM). तेव्हा तो या पुस्तकाबद्दल बोलला. जपानी पुस्तकांच्या वाचनाचे अनुभव, त्याची जपानी भाषेबद्दलची व जपानी साहित्याबद्दलची ओढ आमच्या लक्षात आली. म्हणून त्याने अजून उत्तमोत्तम जपानी पुस्तकांचा अनुवाद मराठीत करावा असा त्याला आग्रह करतो.
तुम्ही हे पुस्तक वाचा आणि तुमचा अनुभव मला नक्की कळवा.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर सामाजिक,ऐतिहासिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- १९४८ चं अग्नितांडव (1948 cha Agnitandav) – रंगा दाते (Ranga Date)
- आवरण (AavaraN) – डॉ. एस. एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa )- (अनुवाद : उमा कुलकर्णी (Uma Kulakarni)
- आमेन-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन(Amen-the autobiography of a nun) – सिस्टर जेस्मी (Sister Jesmi) ( अनुवाद: सुनंदा अमरापुरकर Sunanda Amrapurkar)
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०१९ Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2019
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०२० Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2020
- कृष्णदेवराय (krushadevarai) – डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली (Dr. Laxminarayan Bolli)
- कैफा हालक ओमान (kaiphaa halak Oman ) – सुप्रिया विनोद (Aupriya Vinod)
- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)-प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
- दारा शिकोह (Dara Shikoh) – काका विधाते (Kaka Vidhate)
- बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका (Baluchistanche Maratha : Ek Shokantika) – नंदकुमार येवले (Nadkumar Yewale)
- मंत्रावेगळा (Mantravegala) – ना. सं. इनामदार (Na. S. Inamdar)
- नवे शैक्षणिक धोरण (Nave shaikashnik dhoran) – प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि मंगला गोडबोले (Pro.Dr. Nitin Karmalkar & Mangala Godbole)
- शिवनेत्र बहिर्जी (Shivanetra Bahirji) – प्रेम धांडे (Prem Dhande)
- सेर सिवराज है (Ser Sivaraj hai) – प्रा. वेदकुमार वेदालंकार (Pro. Vedkumar Vedalankar)
- सेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास (Sapiens – Manavjaaticha anokha itihas) – युव्हाल नोआ हरारी (Yuval Noah Harari)
- हा तेल नावाचा इतिहास आहे!… (ha tel navacha itihas ahe!..) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- मी सरकारी डॉक्टर (Mi sarakari doctor) – डॉ. कुमार ननावरे (Dr. Kumar Nanaware)
- मेड इन चायना (Made in China) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) – युवाल नोआ हरारी (Yuval Noah Harari) अनुवादक – प्रणव सखदेव (Pranav Sakhadev)
- खुलूस (Khuloos) – समीर गायकवाड (Sameer Gaikwad)
- Deep state (डीप स्टेट) – मंदार जोगळेकर ( Mandar Joglekar)
- विद्रोह (Vidroh) – हेन्री डेन्कर (Henry Denker) अनुवाद – लीना सोहोनी (Leena Sohoni)
- तिमिरपंथी (Timirapanthi) – ध्रुव भट्ट (Dhruv Bhatt) अनुवाद – सुषमा शाळिग्राम (Sushama Shaligram)
- जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade) – आशुतोष जोशी (Ashutosh Joshi) अनुवाद – सविता दामले, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर (Savita Damle, Mohna Prabhudesai Joglekar)
- वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi) – सदानंद दाते (Sadanand Date)
- पुढचं सोंग (Pudhach Song) – नितीन अरुण थोरात (Nitin Arun Thorat)
- छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar) – गजानन भास्कर मेहंदळे (Gajanan Bhaskar Mehandale)
- मोगरा फुलला (Mogara Phulala) – गोपाळ नीलकंठ दांडेकर (Gopal Neelkanth Dandekar)
- सफाई (Saphai) – सुमेध वडावाला रीसबूड आणि उत्तमकुमार जैन (Sumedh Wadawala Risbud & Uttamkumar Jain)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे साडेतीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link




