

पुस्तक – वैदिक हिंदू ग्रंथ परंपरा : स्वरूप, सार आणि संवाद (Vaidik Hindu Granth Parampara : Swarup, Sar Ani Samvad)
लेखक – माधव जोशी (Madhav Joshi)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १५८
प्रकाशन – ग्रंथाली प्रकाशन, जून २०२६
छापील किंमत – रु. ३००/-
ISBN – 978-93-5650-108-9
हिंदू धर्मियांचा धर्मग्रंथ कुठला ? असा प्रश्न विचारला तर काहीजण म्हणतील “गीता”. काहीजण म्हणतील “वेद”. कोणी म्हणेल रामायण, महाभारत. कोणी भागवत पुराणाचं नाव घेईल. हिंदू धर्माचा कोणी एकच संस्थापक नाही, एकच एक धर्मग्रंथ नाही. त्यात खूप पंथ, उपपंथ आहेत. विविध चालीरीती आहेत, देवदेवता आहेत. हे सामान्य ज्ञान आहे. पण “श्रुती स्मृती पुराणोक्त” असं म्हणताना हे तिन्ही ग्रंथांचे प्रकार आहेत, पुराणांप्रमाणेच श्रुती म्हणजे सुद्धा काही ग्रंथ आणि स्मृती म्हणजे सुद्धा ग्रंथ आहेत ह्याची जाणीव फारच कमी लोकांना असेल. मनुस्मृती सारखे ग्रंथ पुन्हापुन्हा राजकीय चर्चेत येतात तेव्हा त्या ग्रंथांचं ह्या धर्मग्रंथांत नक्की स्थान काय असा प्रश्न येतो.
एखाद्या मोठ्या जमीनदाराच्या, संस्थानिकाच्या पुढच्या पिढीला आपल्या बापजाद्यांची संपत्ती कुठे कुठे आणि किती आहे हे माहीत नसतं. काही जमीन वापरात असते. काही कुठे कुठे असते पत्ता नसतो. काही जडजवाहीर रोजच्या वापरातलं असतं पण तर खजिन्यात अजून किती कोंडलं आहे ह्याची जाणीव नसते. खजिना म्हणून लपवून ठेवलंय ते खरंच आता तितकं मौल्यवान राहिलं आहे का जुनंभंगार झालंय ह्याची शहानिशा करायचीही उत्सुकता वाटत नाही. अशीच अवस्था आजच्या बहुतांश हिंदू समाजाची झाली आहे. ग्रंथपरंपरा मोठी आहे. मोठा वारसा आपल्याला लाभला आहे. पण नक्की ग्रंथ किती? कुठले? त्यांचा परस्पर संबंध काय ? ते काहीवेळा एकमेकांच्या विरुद्ध उपदेश का करतात ? हे विचारलं तर किती जण पाच मिनिटं ह्यावर बोलू शकतील ? फारच थोडे. ह्या पार्श्वभूमीवर ज्ञानाच्या संपत्तीच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या आपल्याला, आपल्याच खजिन्याची जाणीव करून देणारे, खजिन्या पर्यंत पोचण्याचा नकाशा देणारे हे पुस्तक आहे.
पुस्तकात एकूण तेरा अध्याय आहेत. प्रत्येकात एकेका ग्रंथप्रकाराची ओळख करून दिली आहे. ते ग्रंथ कोणाकडून आणि कधी रचले गेले असावेत ह्याबद्दलची तज्ज्ञांची मते आहेत. तिचा विषय आणि परंपरेतलं स्थान समजावून सांगितलं आहे. विषय समजावून सांगण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात, ह्यातून विविध धर्मग्रंथ कसे उदयाला आले हे लक्षात येईल. तर काही वेळा एकाच सत्यापर्यंत पोचण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, त्यातून विविध ग्रंथ उदयाला आले हे लक्षात येईल.
उदा. लेखक पुस्तकात लिहितात,
श्रुती म्हणजे ‘ऐकून’ प्राप्त झालेले – वेद – हिला विशेष स्थान दिले जाते कारण ती मानवी लेखकत्वापलीकडील – अपौरुषेय मानली जाते. ..श्रुती ही अनुभवांतून उमटलेली पण काळाच्या पलीकडील तत्वांचा निर्देश करणारी आहे … स्मृती म्हणजे “स्मरणातून आलेले” मानवी अनुभवावर आधारित , समाज गुण्यागोविंदाने नांदावा यासाठीचे कायदे कानून म्हणजे स्मृती….काही स्मृती परस्परविरोधी दिसतात कारण समाज बदलतो, प्रश्न बदलतात..स्मृती म्हणजे दुय्यम दर्जाचे ग्रंथ नव्हेत. …
पुढे वेदांची रचना सांगितली आहे. महत्त्वाची सूक्ते, प्रसिद्ध ऋचा, चार वेदांचे विषय, उपवेद ह्यांचा संबंध सांगितलं आहे. वेदांची सहा अंगे – वेदांगे – वेदांच्या अध्ययनाला, आचरणाला आणि अर्थबोधाला पूर्णता देतात. वेद मौखिक परंपरेतून अचूक टिकवले जावेत ह्यासाठीची अत्यावश्यक अशी रचना आहे. शिक्षा (उच्चारशास्त्र), कल्प (विधी कसे करावेत), व्याकरण , निरुक्त (शब्दांची उत्पत्ती समजणे), छंद (मात्रांची लय, मात्रा समजणे ), ज्योतिष (कालगणना, खगोलशास्त्र). एवढं वाचल्यावरच लक्षात येतं की किती वेगवेगळं आणि कायस्वरूपी आवश्यक ज्ञान त्यात आहे.
रामायण आणि महाभारत हे नुसती काव्य नाहीत तर इतिहास आहेत. त्याचबरोबरीने पुस्तकातली आदर्श वर्तणूक, नियम आणि व्यक्तिगणिक बदलणारे त्याचे संदर्भ ह्यातून प्रत्यक्ष जगताना होणारे संघर्ष हे अधोरेखित केलं आहे. त्यामुळे धर्मग्रंथाचेच दर्शन रामायण – महाभारतात कसे घडते आणि त्यातून परंपरेतली पुढची साखळी ते कसे ठरतात हे लक्षात येते. महाभारताकडून ते आपल्याला सहज “भागवत”पुराणाकडे नेतात. ते म्हणतात; “महाभारत जिथे गुंतागुंत उलगडते , तिथे श्रीमद्भागवत त्या गुंतागुंतीतून शांततेचा मार्ग दाखवते. महाभारत जिथे कर्तव्याची जाणीव देते, तिथे भागवत त्या कर्तव्याला समर्पणाची आणि आनंदाची अनुभूती देते…”
पुढचा टप्पा पुराणांचा येतो. लेखक म्हणतात, “वेद “उच्च” आणि पुराणे “कनिष्ठ” असं नसून, तत्वज्ञान लोकांच्या अनुभवविश्वात आणण्यासाठी निर्माण झालेली एक सजीव परंपरा आहे….पुराणे म्हणजे धर्माचे लोकशिक्षण – सरळ, परिणामकारक आणि काळाच्या ओघात टिकून राहणारे….पुराणे विविध स्तरांवर उलगडतात – इतिहास आणि दंतकथा, तत्वज्ञान आणि भक्ती, भूगोल आणि खगोल, तसेच समाजरचनेचे प्रतिबिंब…त्यामुळे पुराणे ही केवळ धार्मिक आख्याने म्हणून मर्यादित राहत नाहीत तर संस्कृतीची स्मृती जपणारे समृद्ध कोश ठरतात”. ह्या भूमिकेतून अठरा पुराणांचा गोषवारा दिला आहे.
पुराणांच्या ताकदीबद्दल लेखकाचे विवेचन


वेदांमधल्या तत्वज्ञानातून पुराणातल्या कथांपर्यंत येऊन लेखक आपल्याला पुन्हा तत्वज्ञानाकडे घेऊन जात “दर्शनशास्त्रे – विचारांची शिस्तबद्ध मांडणी” उलगडतात. “मी कोण”, “जगाचे स्वरूप काय”, “सत्याचे तत्व काय” ह्या प्रश्नांना कठोर तर्कबुद्धीने, विश्लेषणात्मक प्रतिसाद म्हणजे दर्शने. सांख्य (विवेकातून मुक्ती), योग (अनुभूतीची शिस्त), न्याय (योग्य विचारांची शिस्त), वैशेषिक (विश्वाची रचना), मीमांसा (कर्म व कर्तव्य), वेदान्त (उपनिषदांचा तात्विक परिपाक) ही दर्शने एकाच प्रश्नांकडे बघण्याचे भिन्न मार्ग दाखवतात. आपले पूर्वज किती बुद्धिमान, तर्कशुद्ध आणि म्हणूनच दुसऱ्याच्या विचारांचा आदर करणारे होते हे लक्षात येते. पुन्हा वेदान्तामध्ये अद्वैत, द्वैत आणि विशिष्टाद्वैत असे तीन मार्ग अनुक्रमे शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य ह्यांनी कसे सांगितले हे स्पष्ट केले आहे.
पुढच्या प्रकरणात सोळा संस्कारांचे अर्थ व त्याचे सामाजिक महत्त्व थोडक्यात सांगितले आहेत. अजून एक कमी चर्चिली जाणारी संकल्पना म्हणजे “आगम”. लेखक लिहितात, “आगम म्हणजे जो परंपरेने आलेला आहे, जो गुरुशिष्य परंपरेतून प्रवाहित होतो. ही परंपरा केवळ लिखित शब्दांवर आधारित नाही; ती अनुभवांच्या सातत्यावर, साधनेच्या शिस्तीवर आणि श्रद्धेच्या ऊर्जेवर उभी आहे. म्हणून आगम समजणे म्हणजे एखादा ग्रंथ वाचणे नव्हे; तर एका सजीव परंपरेत प्रवेश करणे.”. शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, कौमार आणि सौर ह्या मुख्य पंथांची तोंडओळख करून दिली आहे. पुढे “भक्ती परंपरा” मूळ धर्माच्या विपरीत नाही तर तिने धर्माला लोकाभिमुख केले हे सांगत हजारो वर्षांचा ज्ञानाचा प्रवास अगदी आत्तापर्यंत कुठल्या वळणापर्यंत पोचला आहे ह्याची जाणीव करून दिली आहे.
“दर्शनां”ची आणि “प्रस्थान त्रयी” ह्यांची ओळख


शेवटच्या प्रकरणात सगळ्याचा गोषवारा घेत अनेकातील एकरूपत्वाचा, विवेकाचा मार्ग अधोरेखित केला आहे. आपली परंपरा आंधळी नाही, तर ती विचार करायला सांगते, दुसऱ्याचे विचार ऐकायला सांगते. त्यात विरोधाभास दिसला तरी जवळून बघितल्यावर त्यात भिन्नतेचा सादर स्वीकार आहे. म्हणून समारोप करताना ते म्हणतात, “आपण विचार करणार का, प्रश्न विचारणार का, आणि विवेकाने जगणार का – यावरच या परंपरेचा खरा अर्थ अवलंबून आहे.”.
माधव जोशींसारख्या कॉर्पोरेट क्षेत्र गाजवलेल्या आणि अजूनही त्यात सक्रिय असलेल्या व्यक्तीने आपल्याला हा विषय समजावून सांगितला आहे.
माधव जोशींच्या पुस्तकात दिलेल्या माहितीचा थोडा भाग.

ते स्वतः वेदपारंगत पंडित किंवा धर्ममार्तंड असे नसल्यामुळे, कदाचित, बोजड – अगम्य अशी शब्दरचना त्यांनी केलेली नाही. तसंच अपेक्षित वाचकवर्ग आणि पुस्तकाच्या भूमिकेला साजेसे तपशीलच दिले आहे. ग्रंथ आणि त्यातला विषय ह्याकडे अंगुलीनिर्देश करून चर्चा थोडक्यात आटपली आहे. त्यामुळे निवेदनाचा ओघ कायम राहिला आहे. ह्या ग्रंथांवरच्या टीका (उणीवा दाखवणे, चूक ठरवणे ह्या अर्थी), समाजसुधारक किंवा परधर्मीयांनी दाखवलेले दोष हा भाग मात्र पुस्तकात घेतलेला नाही. ह्यावरही थोडं लिहायला हवं होतं असं वाटलं. तसंच स्वधर्मियांनी ग्रंथांचा चुकीचा किंवा स्वार्थी अर्थ लावल्याने झालेले नुकसान ह्याबद्दल थोडं लिहायला हवं होतं. जेणेकरून ह्या अभ्यासाची दुसरी बाजूही समजली असती.
आता काही दिवसांवरच गणेशोत्सव येऊन ठेपला आहे गणपती समोर भक्तीभावाने आरत्या म्हणताना तुम्ही या ओळी सहज म्हणाल ..
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर सामाजिक,ऐतिहासिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- १९४८ चं अग्नितांडव (1948 cha Agnitandav) – रंगा दाते (Ranga Date)
- आवरण (AavaraN) – डॉ. एस. एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa )- (अनुवाद : उमा कुलकर्णी (Uma Kulakarni)
- आमेन-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन(Amen-the autobiography of a nun) – सिस्टर जेस्मी (Sister Jesmi) ( अनुवाद: सुनंदा अमरापुरकर Sunanda Amrapurkar)
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०१९ Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2019
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०२० Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2020
- कृष्णदेवराय (krushadevarai) – डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली (Dr. Laxminarayan Bolli)
- कैफा हालक ओमान (kaiphaa halak Oman ) – सुप्रिया विनोद (Aupriya Vinod)
- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)-प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
- दारा शिकोह (Dara Shikoh) – काका विधाते (Kaka Vidhate)
- बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका (Baluchistanche Maratha : Ek Shokantika) – नंदकुमार येवले (Nadkumar Yewale)
- मंत्रावेगळा (Mantravegala) – ना. सं. इनामदार (Na. S. Inamdar)
- नवे शैक्षणिक धोरण (Nave shaikashnik dhoran) – प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि मंगला गोडबोले (Pro.Dr. Nitin Karmalkar & Mangala Godbole)
- शिवनेत्र बहिर्जी (Shivanetra Bahirji) – प्रेम धांडे (Prem Dhande)
- सेर सिवराज है (Ser Sivaraj hai) – प्रा. वेदकुमार वेदालंकार (Pro. Vedkumar Vedalankar)
- सेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास (Sapiens – Manavjaaticha anokha itihas) – युव्हाल नोआ हरारी (Yuval Noah Harari)
- हा तेल नावाचा इतिहास आहे!… (ha tel navacha itihas ahe!..) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- मी सरकारी डॉक्टर (Mi sarakari doctor) – डॉ. कुमार ननावरे (Dr. Kumar Nanaware)
- मेड इन चायना (Made in China) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) – युवाल नोआ हरारी (Yuval Noah Harari) अनुवादक – प्रणव सखदेव (Pranav Sakhadev)
- खुलूस (Khuloos) – समीर गायकवाड (Sameer Gaikwad)
- Deep state (डीप स्टेट) – मंदार जोगळेकर ( Mandar Joglekar)
- विद्रोह (Vidroh) – हेन्री डेन्कर (Henry Denker) अनुवाद – लीना सोहोनी (Leena Sohoni)
- तिमिरपंथी (Timirapanthi) – ध्रुव भट्ट (Dhruv Bhatt) अनुवाद – सुषमा शाळिग्राम (Sushama Shaligram)
- जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade) – आशुतोष जोशी (Ashutosh Joshi) अनुवाद – सविता दामले, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर (Savita Damle, Mohna Prabhudesai Joglekar)
- वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi) – सदानंद दाते (Sadanand Date)
- पुढचं सोंग (Pudhach Song) – नितीन अरुण थोरात (Nitin Arun Thorat)
- छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar) – गजानन भास्कर मेहंदळे (Gajanan Bhaskar Mehandale)
- तुकाराम (Tukaram) – शफी पठाण (Shafi Pathan)
- ज्युलियस सीझर (Julius Caesar) – विल्यम शेक्सपियर (William Shakespeare) अनुवाद – शिरीष सहस्रबुद्धे (Shirish Sahasrabuddhe)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. हे माझं ३७१वं पुस्तक परीक्षण. मी परीक्षणे लिहिलेल्या पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link




