पुस्तक – डोंगराएवढा (Dongaraevadha)
लेखक – शिवराम कारंत (Shivram Karant)
अनुवादक – उमा वि. कुलकर्णी (Uma V. Kulkarni)
भाषा – मराठी (Marathi)
मूळ पुस्तक – बेट्टद जीव (Bettada Jeeva) (ಬೆಟ್ಟದ ಜೀವ)
मूळ पुस्तकाची भाषा – कन्नड (Kannada)
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस , १९८५
पाने – १४८
छापील किंमत – रु. १८०/-
ISBN – 9788171617661

दक्षिण कर्नाटकात डोंगरदऱ्यांत वसलेल्या एका छोट्या खेड्यातली ही गोष्ट आहे. कादंबरीचा निवेदक – शिवराम नावाचा तरुण – एका गावाहून दुसऱ्या गावी आडवाटेने चालत चालला होता. चालता चालता उशीर झाला, अंधार पडला आणि तो रस्ता चुकला. योगायोगाने तिथले दोन गावकरी त्याला भेटले. त्याला म्हणाले, “आता इतक्या उशीरा, अंधारातून तुमच्या गावी पोचणं कठीण आहे. आजचा दिवस इथे राहा. सकाळी पुन्हा जा”. हाच बरा पर्याय वाटून तो त्यांच्याबरोबर थांबायचं ठरवतो. पण गावकऱ्यांचं अगत्य इतकं की एका रात्रीपुरता करायचा मुक्काम आठवाडाभर लांबतो. गावकऱ्यांशी गप्पागोष्टी होतात, गावात आणि आजूबाजूला फिरणं होतं. त्या गप्पांचं, फिरण्याचं हे वर्णन म्हणजे ही रसाळ कादंबरी आहे.

शिवराम ब्राह्मण असल्यामुळे गावकरी त्याला गावातल्या ब्राह्मणाच्या घरी घेऊन जातात. गोपालय्या आणि शंकरम्मा असं हे वृद्ध दांपत्य आहे. ते त्याची प्रेमाने राहायची व्यवस्था करतात. हे दांपत्य, त्यांचा मानलेला मुलगा-सून, शेजारी “देरण्णा”, कामगार “बट्ट्या” ह्या सगळ्यांशी भेटणं, बोलणं होतं. गोपालय्यांच्या घरी, त्यांच्या मानलेल्या मुलाच्या घरी आग्रहाने खाऊपिऊ घालणं होतं.

गावाभोवती हिरवेगार डोंगर, गर्द झाडी आहे. धबधबे, झरे, नदी अशी पाण्याची मुबलकता आहे. स्वच्छ हवेमुळे प्रसन्न वातावरण. पण शहरापासून, गाडीरस्त्यापासून फार दूर. दुर्गम ठिकाण. त्यामुळे फारच थोडे लोक तिथे राहतायत, तांदूळ, ऊस ह्यांची शेती करतायत. नारळ , सुपारीच्या बागा राखतायत. निसर्ग अनंत हस्ताने द्यायला तयार आहे पण तितक्याच हातांनी परत घ्यायला ही तयार आहे. पाऊस, वादळ, माकडांचा उच्छाद आहे. रानातल्या हत्तींची झुंड शिरून ऊस आणि पोफळीच्या बागांची नासधूस करतात. रात्री अपरात्री वाघाची डरकाळी तर जवळून ऐकू येते. असं असूनही लोक इथे राहतायत. त्यात आपल्या मायभूमीचं प्रेम आहे. थोडा सवयीचा भाग आहे. त्याहून अधिक म्हणजे गोपालय्यांची जिद्द आहे. डोंगराशी सलगी करत पण रान मोकळं करून शेत-मळे-बागा उभारायची दुर्दम्य इच्छा आहे. तरुणपणात त्यांनी कष्ट करून हा भाग कसा रंगरूपाला आणला हे त्याला समजतं आणि अजूनही योग्य साथ मिळाली तर नव्याने काही आणायची जिद्द जाणवते.

दुर्गम भागामुळे माणसांची वस्ती कमी. बाहेरून येणाऱ्याजाणाऱ्यांची वर्दळही नगण्यच. त्यामुळे माणसाला माणूस भेटणे हे ही अप्रूपच. त्यामुळे पाहुण्यांना काय काय दाखवू आणि काय नको असं त्यांना होत असतं. त्यामुळे थंडगार नदीत अंघोळ, वाघाची शिकार, दाट अरण्यातून भटकंती असे बरेच प्रसंग घडतात. फिरून आल्यावर पाहुणे दमले असतील म्हणून अंगाला तेल लावून गरम काढत पाण्याने अंघोळीची सोय करतातच. आणि वर पाहुणा संकोचतोय हे बघून स्वतः अंगाला तेल लावून देतात. असा लोभाचा धबधबाच जणू ! तरी शहरी शिवरामला लक्षात येतं की कितीही सुंदर वाटलं तरी आपण काही अशा एकलकोंड्या ठिकाणी राहू शकणार नाही बुवा ! म्हणूनच गोपालय्या, शंकरी, गावकरी ह्यांचा पाहुणचार, कष्ट हास्यविनोद करत स्वतःचं जीवन सुसह्य करण्याचा प्रत्यन ह्याचं कौतुक त्याला वाटतं.

ह्या वर्णनाला एक समांतर धागा सगळ्यांच्या बोलण्यातून येत असतो की गोपालय्या आणि शंकरम्मा ह्यांचा मुलगा तरुणपणी शिकायला म्हणून शहरात गेला. मधून मधून तो गावी येत असे. मग नोकरी लागल्यावर गावाला त्याचं येणंजाणं कमी होत गेलं. आणि आता ते बंदच झालं. मुलाची भेट व्हावी म्हणून म्हातारा म्हातारी तळमळतायत. बोलताना पुन्हा पुन्हा तो विषय निघतोय, आणि पुन्हा पुन्हा काहीतरी हास्यविनोद करून ते अश्रू लपवत विषय मागे टाकतायत. मानलेल्या मुलाला त्याच्या मुलांना आता आपलं समजून वागतायत. आपला पाहुणा शहरातून आलेला आहे. कदाचित त्याला आपला मुलगा कधी दिसला, भेटला तर त्याने मुलाला आपली अवस्था सांगावी; आईवडिलांना भेटायला जायला सांगावं; अशी वेडी आशासुद्धा बाळगतायत. तो मुलगा कोण असेल का नसेल परत आला ? ह्याचा उलगडा कादंबरी वाचल्यावरच होईल.

काही पाने उदाहरणादाखल
गावापासून थोडा लांब असलेला गोपालय्यांचा “काटेमुलू” मळा बघायला सगळे जातात तो चालण्याचा प्रसंग.

कन्नड ब्रह्माणांमधल्या जाती पोटजातींमधल्या स्वभाववैविध्यावर मिश्किल टिप्पणी

म्हाताऱ्या नवराबायकोच्या समंजस वागण्याचं, लटक्या रागाचं आणि पुन्हा एकमेकांची चेष्टा करण्याचं अप्रूप शिवरामला वाटतं. तेव्हाचा संवाद.

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती

पुस्तकात दिलेली अनुवादिकेची माहिती

सुरुवातीपासून जाणवणारे एक लहानसे रहस्य आणि त्याचा उलगडा हे नाट्य असले तरी तो पुस्तकाचा मूळ गाभा नाही असं मला वाटलं. त्या परिस्थितीचं, माणसांचं वर्णन हेच कादंबरीचे कथाबीज आहे. बाहेर निसर्ग-डोंगर-वन्यप्राणी  ह्यांच्याशी जुळवून घेत आणि मनात ह्या विरहाशी जुळवून घेत, कटुता न बाळगता, जमेल तितक्या आनंदाने, परोपकाराने, परिपक्वतेने जगणाऱ्या “डोंगराएवढे” व्यक्तिमत्त्व असणाऱ्या गोपालय्यांची ही कहाणी आहे. शहरी जीवन आणि गावाकडचं जीवन ह्यातला फरक हलकेच सुचवणारी, निसर्गाचं मोहक वर्णन करणारी, निसर्गाच्या आव्हानाची जाणीव करून देणारी, गावाकडच्या लोकांच्या प्रेमळ आतिथ्याची ही कहाणी आहे. लेखकाची लेखणी समर्थ आहेच. शब्द-वाक्प्रचार ह्यांची गंमत, चित्रमय वर्णन, तो निसर्ग, तिथल्या माणसांचा भोळेपणा-चतुरपणा ही वातावरणनिर्मिती गुंतवून ठेवणारी आहे. मूळ कन्नड पुस्तकाचा उमा ताईंनी केलेला मराठी अनुवाद तितकाच ताकतीचा … “डोंगराएवढा” ! त्यामुळे कादंबरी संपली, रहस्य कळले तरी आता गोपालय्या, शंकरम्मा, नारायण वगैरे मंडळींच्या आयुष्यात पुढे काय होईल हे लेखकाने सांगत राहावे आणि आपण वाचत राहावे असे वाटते.

नेटवर शोधताना कळले की ह्या कादंबरीवर कन्नड चित्रपटही आहे. तोही कादंबरीप्रमाणेच लोकप्रिय आहे.
https://www.youtube.com/watch?v=iZbV9gxBAKM

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

ग्रामीण जीवनावरील इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

 

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link

 

लोकप्रिय आणि सुश्राव्य तमिळ गाण्यांचे अर्थ मराठीत सांगण्याचा आणि त्याचे तमिळ बोल मराठीत(देवनागरी लिपीत) सांगण्याचा उपक्रम मी करतो आहे. बरीच गाणी मराठीत उपलब्ध आहेत.
ते वाचण्यासाठी लिंक https://learnmarathiwithkaushik.com/tamil-song-lyrics-meaning-in-marathi/
माझा हा प्रयत्न कसा वाटला ते सांगा. आवडला तर शेअर करायला विसरू नका.
तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीचं तमिळ गाणं सुचवा. ते गाणं मराठीत आणण्याचा प्रयत्न करेन.

Jaxx Wallet

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

jaxxwallet-liberty.com

Jaxx Wallet