पुस्तक – नागालँडच्या अंतरंगात (Nagalandchya Antarangat)
लेखिका – अर्चना जगदीश (Archana Jagadeesh)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २००
प्रकाशन – प्रफुल्लता प्रकाशन, नोव्हेंबर २०१७
छापील किंमत – रु. २५०/-
ISBN – 978-81-87549-85-7

डिसेंबर २०२४ मध्ये पुण्यात झालेल्या “विश्व मराठी संमेलना”तल्या पुस्तक प्रदर्शनात ज्येष्ठ प्रकाशक गुलाब सकपाळ आणि त्यांची कन्या द्वितीया सोनावणे (त्याही प्रकाशक) ह्यांची भेट झाली. भेट झाली. ह्याआधी फक्त फेसबुकवर गप्पा झाल्या होत्या. प्रत्यक्ष भेटून सर्वांना आनंद झाला. काकांनी मला भेट देण्यासाठी त्यांच्या प्रकाशनाचे पुस्तक मला निवडायला सांगितले. तेव्हा ह्या पुस्तकाने माझे लक्ष वेधले. मी फारसा न वाचलेला विषय असल्यामुळे उत्सुकता वाटली. पुस्तक चाळल्यावर कळले की ह्या पुस्तकाला २०१७, १८ मध्ये मान्यवर संस्था व वाचनालयांचे पुरस्कार मिळाले आहेत. ह्या भेटीसाठी काकांचे मनापासून आभार.

लेखिका अर्चना जगदीश ह्या वनस्पतिशास्त्रज्ञ आणि संशोधक आहेत. १९९४ मध्ये त्यांनी ह्याविषयातली पी.एच.डी. मिळवली आहे. भारत सरकारच्या “वनस्पती सर्वेक्षण विभागा”त त्यांनी पुण्यात काही वर्षे नोकरी केली. कामासाठी आणि आवडीमुळे सह्याद्री पर्वत आणि इतर डोंगराळ भागांत त्यांची भटकंती चालू होती. ईशान्य भारताच्या पर्वतराजींमध्ये दडलेल्या घनदाट जंगलांचे आकर्षण तेव्हापासून त्यांना होते. पुढे त्यांनी सरकारी नोकरी सोडून स्वतःची स्वयंसेवी संस्था काढून ह्याच विषयात स्वतःच्या रुचीनुसार काम सुरु केले. त्यातूनच नागालँडच्या सरकारने सुरु केलेल्या एका प्रकल्पावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. “नेपेड”नावाचा हा प्रकल्प तिथल्या लोकांची जीवनपद्धती, वनस्पती वैविध्य, शेतीच्या पद्धती ह्यांचे सर्वेक्षण, नोंदी करणे व त्यातून ग्रामविकासाचे उपाय सुचवणे असा बहुउद्देशीय होता. त्यासाठी १९९०च्या दशकात अर्चनाजींनी नागालँड मध्ये बरेच महिने प्रवास केला. सुदूर दुर्गम खेडेगावांत जाऊन गावकऱ्यांशी भेटीगाठी घेतल्या. दुभाषांमार्फत लोकांशी संवाद साधला. जंगलात जाऊन पानं-फुलं गोळा केली. ह्या सगळ्या अनुभवांचे वर्णन पुस्तकांत आहे. त्यांनी अरुणाचल प्रदेशला सुद्धा भेट दिली होती. त्या अनुभवावर एक लेख आहे.

महाराष्ट्रापासून खूप दूर, दुर्गम असलेला नागालँड. तिथे नागा आदिवासी राहतात. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांचे पूर्ण धर्मांतरण केले आहे. नागा सशस्त्र बंडखोरी, सीमावर्ती भाग असल्यामुळे घुसखोरी अशा सुरक्षाविषयक समस्या सुद्धा आहेत. इतपतच माहिती मला होती. टीव्हीवरच्या बातम्या, समाजमाध्यमे, वर्तमानपत्रातले लेख ह्याममध्ये पण नागालँड हा काही नेहमी येणारा विषय नाही. त्यामुळे हे पुस्तक माहिती वाढवणारे आहे. पण बघितलेल्या ठिकाणांचे स्थलवर्णन नाही. प्रवासवर्णन नसलं तरी ह्यातलं “प्रवासाचं”वर्णन वाचण्यासारखं आहे. पुणे – कोलकाता – दिमापूर विमान प्रवास आणि मग बस, छोट्या गाड्या तर कधी मैलोनमैल चालत इष्टजागी पोचायला लागायचं. प्रत्येक प्रवासाचं हे दिव्य वाचताना ते लोक मुख्य भारतापासून (इंडियन प्लेन्स पासून) किती दुरावलेले आहेत हे जाणवते.

आदिवासींची शेती पद्धती म्हणजे “झूम” पद्धती. जंगल तोडून जागा शेतीयोग्य करतात. तिथे एकदोन वर्ष शेती केली की ती जागा सोडून दुसरी जागा साफ करतात. असं करत करत साताठ वर्षांनी पुन्हा पाहिल्याजागी येतात. तोपर्यंत तिथे पुन्हा रान माजलेलं असतं. शेती कशी करतात, त्यात काय लावतात, पुरुष कुठली कामं करतात, बायका कुठली कामं करतात याचं सुद्धा सविस्तर वर्णन आहे. किती वर्षांनी पुन्हा त्याच जागी यायचं, झाडं कशी तोडायची, प्रत्येक जागेला काय म्हणायचं हे सुद्धा प्रत्येक जमातीनुसार वेगवेगळं आहे. एक छोटं राज्य असलं तरी कितीतरी जमाती, उपजमाती आहेत. त्यांचं खानपान वेगळं, बोलीसुद्धा वेगळ्या. इतक्या, की एकमेकांनाही न समजणाऱ्या. तिथल्या तिथे फिरताना सुद्धा वेगवेगळ्या दुभाषांची गरज पडावी. हे वाचल्यावर जाणवतं की दुर्गमतेमुळे किती कप्पे पडले आहेत. आपल्या भाषेचा, जमातीचा टोकाचा अभिमान बाळगला गेला तर पदोपदी संघर्षाला वाव आहे. “विविधतेत एकता”, “हम सब एक है” ह्या घोषणा किती आव्हानात्मक आहेत.

इतके महिने तिकडे राहिल्यावर तिथलं वेगवेगळ्या प्रकारचं खाणं त्यांनी “बघितलं” तरी. नागा लोक सर्वभक्षी. चिकन, मटण हे साधं झालं. डुक्कर, गायबैल खाणं नेहमीचंच. इतकंच काय खारी, पक्षी, किडे, अळ्या, मधमाश्या असं सगळं खातात. कुत्र्याचं मांस हे तर “स्वादिष्ट”. शहरातल्या बाजारांत, गावच्या बाजारांत असा मांडलेला “रानमेवा” त्यांनी बघितला. तांदळाची दारू “झू” हे तर सर्वमान्य पेय. अशा काही गमती त्यात आहेत. खाण्यापिण्याच्या अशा सवयी वाचून असं वाटतं की भारतापेक्षाही चिनी लोकांशी जास्त साम्य आहे. दिसण्यातही तसे ते मंगोलवंशीय. त्यामुळे पुन्हा एकदा “विविधतेत एकता” टिकवण्याचं जबरदस्त आव्हान लक्षात येतं. पुस्तकात असं म्हटलं आहे की नागा जमाती म्यानमार मध्ये सुद्धा आहेत. मनात असा विचार आला की निसर्गाच्या ह्या लेकरांना “निसर्गापासून दूर गेलेल्या लेकरां”नी असं कृत्रिम सीमांनी विभागून टाकलं आहे.

आदिवासी सगळे मिळून मिसळून काम करणारे. पण तरीही तिथे गावाचा/जमातीचा राजा अशी संकल्पना आहेच. पण तो राजा म्हणजे काही फार श्रीमंत , महालात राहणार असा नाही. इतरांपेक्षा थोडी मोठी झोपडी आणि केवळ एक मनाची पदवी असंच. पूर्वीच्या काळी मुलगा वयात आला की त्याला दुसऱ्या जमातीच्या माणसाला मारून त्याचं मुंडकं आणायला लागे. मात्र ते नरभक्षी नव्हेत. आता ही परंपरा मागे पडली आहे. पण “हेड हंटिंग” च्या कवट्या त्यांनी बघितल्या. गावात एका सार्वजनिक झोपडीत अशा कवट्या ठेवल्या जात. अशा झोपड्या म्हणजे गावाच्या वयस्करांनी आपलं शहाणपण पुढच्या पिढीकडे देण्याच्या जागा. नागा वनवासींच्या अशा त्यांना दिसलेल्या प्रथांविषयी ही त्यांनी लिहिलं आहे. तिथल्या फुटीरतावादी, सशस्त्र बंडखोरांशीही अवचित गाठ पडली. ती क्रूर नजर, हिसंक कृत्य ह्यातून सुदैवाने त्या सुखरूप बाहेर पडल्या. त्याचे दोन थरारक किस्सेही आहेत. स्थानिकांशी त्याविषयी जास्त न बोलता, आपल्या कामावर लक्ष देण्याचे धोरण ठेवून त्यांनी स्वतःला अलिप्त व सुरक्षित ठेवले.

पुस्तकात ९४-९५ च्या आसपासचा नागालँड आहे. तिथल्या लोकांना सुद्धा मुख्य भारताप्रमाणे विकसित व्हायचं आहे, तरुणांना साहजिकपणे शहरी जगण्याचं आकर्षण आहे. पैसे मिळवण्यासाठी तिथे नगदी पिकं आणि लाकूडतोड मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. शहरात राहून आलेली, जीन्स टीशर्ट घालणारी मुलं शेती-जंगल आधारित जगण्यापासून दूर जात आहेत. त्याला चूक तरी कसं म्हणणार ? पण काहीतरी चुकतंय हे खरं. म्हणूनच नागालँडची जाणीव वाढवून पण विकास करायचा म्हणजे नक्की काय, कसा, लोकसहभाग कसा मिळवायचा , प्रयोग आर्थिकदृष्टया सक्षम कसे करायचे असे असंख्य प्रश्न मनात घेऊनच त्यांनी आपल्या संशोधन कामाचा शेवट केल्याचं लक्षात येतं.

आता काही पानं उदाहरणादाखल वाचा.

नागांच्या सर्वभक्षित्वाची एक झलक

सर्वांनी मिळून घरं – झोपड्या बांधायची पद्धत

अंतर्गत प्रवासाची काठिण्यपातळी आणि दिसणारं निसर्गसौंदर्य


असं हे पुस्तकाचं स्वरूप आहे. ह्यात प्रवास असला तरी हे नमुनेदार प्रवासवर्णन नाही. संशोधनपर कामाशी संबंधित असलं तरी रुक्ष आकडेवारी, तांत्रिक तपशील नाहीत. वने, शेती, सामाजिक पद्धती ह्यांचं हे दस्तऐवजीकरणही नाही. तर प्रवास करताना, माणसांना भेटताना सहजपणे काय दिसलं, जाणवलं, वेगळेपण भावलं ह्याच्या नोंदी आहेत. लेखिकेने आपल्याशी मारलेल्या गप्पा आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा त्याच त्या प्रकारच्या वर्णनाची पुनरुक्तीही जाणवते. ती थोडी कमी करता आली असती. तिथला भूगोल आणि दिशा आपल्या परिचयाच्या नाहीत त्यामुळे प्रवासाची दिशा कळत नाही. अजून नकाशे टाकून ते सांगायला हवं होतं. पुस्तकात फक्त मुखपृष्ठाच्या आत सहा फोटो आहेत. वर्णनाच्या बाजूला अजून फोटो किंवा रेखाचित्रे हवी होती. लेखिकेने केलेल्या संशोधनाचं/सर्वेक्षणाचं काय निष्पन्न झालं हा प्रश्न, “नेपेड” प्रकल्पात त्याचा काय हातभार लागला हे मला कळलं नाही. पुस्तक वाचताना आपण लेखिकेचे सह-सर्वेक्षक बनतो. त्यामुळे “आपल्या” सर्वेक्षणाची फलश्रुती काय हे न कळल्यामुळे चुटपुट लागते.

अर्चनाजींच्या धाडसामुळे, मन लावून केलेल्या कामामुळे आणि ते पुस्तक स्वरूपात आणल्यामुळे नागालँड सारख्या आपल्याच देशाच्या एका भागाबद्दलची आपली जाणीव वाढेल. ती अजून वाढली पाहिजे अशी उत्सुकता होईल हे नक्की. अशा अनवट मराठी पुस्तकासाठी लेखिका अर्चना जगदीश आणि प्रकाश गुलाब सकपाळ ह्यांचे आभार.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर प्रवास वर्णनांची , प्रवासावर आधारित पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link

 

Jaxx Wallet

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

jaxxwallet-liberty.com

Jaxx Wallet