पुस्तक – The bridges of Madison county (द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी)
लेखक – Robert James Waller (रॉबर्ट जेम्स वॉलर)
भाषा – English (इंग्रजी)
पाने – १७१
प्रकाशन – पेंग्विन रँडम हाऊस, १९९२
छापील किंमत – रु. ५५०/-
ISBN – 978-0-099-42134-4

ही एक गाजलेली इंग्रजी कादंबरी आहे. गोष्ट अशी आहे की रॉबर्ट किंकेड हा एक मध्यमवयीन छायाचित्रकार नॅशनल जियपोग्राफिक सारख्या मासिकांसाठी निसर्ग छायाचित्रणाचे काम करतो आहे. त्यासाठी तो जगभर फिरतो आहे. सतत फिरणं, निसर्ग बघणं , फोटो काढणं हेच त्याचं आयुष्य आहे. जणू वेगळ्या प्रकारच्या “भटक्या जमतीतला”च एक सदस्य. अमेरिकेतल्या “मॅडिसन काऊंटी ” भागातल्या वैशिष्ट्यपूर्ण पुलांवर स्टोरी करण्यासाठी तो आला आहे. अनोळखी भागात रस्त्याची चौकशी करताना त्याची अनपेक्षित गाठ पडते एका घरातल्या मध्यमवयीन विवाहितेशी -फ्रान्सिस्काशी. नजरानजरेतून, जुजबी बोलण्यातून त्यांना एकमेकांबद्दल काहीतरी वेगळं आकर्षण वाटतं. दोघेही मध्यमवयीन. फ्रान्सिस्का विवाहित, दोन मुलांची आई. तर रॉबर्ट घटस्फोटित. मग पुढे काय होतं ? त्यांची ओळख वाढते का ? एकेमेकांना भेटतात का ? प्रेमात पडतात का ? भेटत राहतात का ? मग घरच्यांचं काय ? लोक काय म्हणाले असतील ? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचावं लागेल.

कादंबरीचे कथानक अगदी लहान आणि सोपे आहे. पण ज्या पद्धतीने प्रसंग रंगवले आहेत, व्यक्तीचित्रणे रंगवली आहेत त्यातून कादंबरी आकर्षक आणि वाचनीय झाली आहे. रॉबर्ट कसा आहे, फ्रान्सिस्का कशी आहे, ते तसं का वागले, त्यांनी तसेच निर्णय का घेतले हे आपल्याला पटतं, आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. भारतीय कुटुंबव्यवस्थेत अशा दोन व्यक्तींचा संबंध म्हणजे व्यभिचारच. ग्रामीण अमेरिकन समाजातही तो तसाच समाजला गेला असेल असंच पुस्तक वाचून जाणवतं. तरीही भारतापेक्षा अमेरिकेत लोकांनी ते लवकर पचवलं असतं किंवा लवकर विस्मृतीत गेलं असतं. त्यामुळे हे कथानक तिथेच घडू शकेल आणि तिकडेच शोभेल.

पुस्तकाची कथन शैली वेगळी आहे. आधी लेखिका थेट आपल्याशी बोलते की तिला हे प्रसंग कसे कळले. मग ती रॉबर्टचं आयुष्य सांगायला लागते. त्याचं व्यक्तिमत्त्व पूर्ण उभं राहतं. प्रसंग घडत घडत रॉबर्ट मॅडिसन काऊंटी पर्यंत येतो. तिथून फ्रान्सिस्का चे आजचे जीवन. तिच्या जीवनातल्या आठवणींतून, पूर्व दृश्यांतून रॉबर्ट-फ्रान्सिस्का ची भेट उलगडते. पुढे काय झालं असेल ह्याची उत्कंठा वाढते. पुढच्या काही पानांत ते वर्णन येत. पण पुस्तक तिथे थांबत नाही. तर, ही खाजगी गोष्ट लेखिकेला कशी कळली ह्याचे उपकथानक जे पुस्तकाच्या सुरुवातीला आलं होतं त्याचा पूर्वार्ध येतो. अशी ही काळात पुढे-मागे जाणारी तरी गोंधळात न टाकणारी शैली आहे. रॉबर्टच्या फोटो काढण्याच्या प्रसंगांचं अतिशय तपशीलवार वर्णन आहे. कुठली लेन्स वापरली, कसा अँगल लावला, हालचाली कशा केल्या ह्यातून अस्सल प्रसंग आपल्याला दिसतो. त्यांच्या भेटीचे, प्रेमाचे, विरहाचे भावपूर्ण चित्रण आहे. कुठेही बटबटीतपणा न आणता. हे बहुतांश वाचकांना आवडलं असणार म्हणून ही कादंबरी “बहुखपाची”/”बेस्ट सेलर” झाली असणार. कदंबरीवर हॉलिवूड चित्रपट सुद्धा आला आहे.

पुस्तकाची काही पाने वाचून बघा म्हणजे अजून नीट कल्पना येईल

रॉबर्ट पुलाचे फोटो काढतो तेव्हाचे वर्णन

फ्रान्सिस्का रॉबर्टचे स्वागत घरी करते. आकर्षण वाढू लागते आहे. ते एकमेकांबरोबर घरात नृत्य करतात.

त्यांचं छायाचित्रणाचं काम संपल्यावर त्याला निघावं लागतं. निरोपाचा, पुन्हा भेटण्याचं ठरवण्याचा प्रसंग.

तुम्हाला सुद्धा प्रेमकहाण्या वाचायला आवडत असतील तर ही कादंबरी आवडेल.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर प्रेमकथा किंवा भावनाप्रधान पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe