पुस्तक – Heart bones (हार्ट बोन्स )
लेखिका – Colleen Hoover (कॉलीन हूवर)
भाषा – English (इंग्रजी)
पाने – ३२४
प्रकाशन – २०२०
ISBN – 9798671981742
“बेया” आणि “सॅमसन” अशा दोन तरुणांची ही प्रेमकहाणी आहे. बेया एक कॉलेज तरुणी तिच्या आईबरोबर राहते आहे. तिचे वडील परराज्यात राहतात. आईवडील एकत्र राहत नाहीयेत. बेयाची आई तरुण असताना घडलेल्या शरीरसंबंधातून – वन नाईट स्टॅन्ड मुळे – झालेली ही संतती. पण त्या तरुणाने आपली जबाबदारी पूर्णपणे स्वीकारलीही नाही आणि पूर्णपणे टाकलीही नाही. वर्षांतून काही वेळा तो मुलीला फोन करतो. वर्षातून एकदा दोन आठवडे स्वतःच्या घरी नेतो. पण मुलीचा आणि वडिलांचा प्रेमाचा धागा जुळला गेला नाहीये. तिची आई अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेलेली आहे. किडूकमिडूक कामं करून कधी पुरुषांशी सलगी करून ती पैसे मिळवते. पण एकूण मुलीकडे दुर्लक्षच. बेया कशीबशी काम करून पैसे मिळवते आहे. शिक्षण थोडंफार चालू आहे.
एकेदिवशी अमली पदार्थाच्या अतिसेवनाने बेयाची आई मरण पावते. बेया निराधार होते. घराचं भाडं थकलेलं असल्यामुळे घरमालक सुद्धा तिला घर सोडायला सांगतो. मनाचा हिय्या करून ती वडिलांना फोन करते. काय झालं आहे हे न सांगता फक्त त्यांच्याबरोबर थोडे दिवस राहायचं आहे असं सांगते.
वडिलांचं लग्न एका घटस्फोटितेशी झालं आहे. वडील, त्यांची बायको आणि तिची पहिल्या लग्नाची मुलगी असे ते एकत्र राहतायत. हे तिघे बेयाचं चांगलं स्वागत करतात. वडील प्रेमाने वागत असले तरी तिचा वडिलांवर रागच असतो. तिची सावत्र बहीण आपल्या मित्रांशी ओळख करून देते. त्यातल्या “सॅमसन”ला बॉयफ्रेंड बनव म्हणून मागे लागते. बेयाला ह्या कशातही रस नसतो. आपलं उद्ध्वस्त आयुष्य कसं सावरायचं ह्याची तिला चिंता सतावत असते. प्रत्येक वेळी तिची आणि सॅमसन ची भेट होते तेव्हा काहीतरी गैरसमजच होतात. दुसरीकडे सॅमसन सुद्धा घुमा, आपलं आपलं काम करणारा, पण श्रीमंत, तरी मुलींशी संबंध ठेवणारा आणि बेयात रस न घेणारा असा.
आपल्याला एकमेकांत काही रस नाहीये हे एकमेकांना सुचवत असतात. सांगत असतात. पण त्यातूनच “असं का” अशी उत्सुकता पण निर्माण होते. ते बोलू लागतात. पुढे त्यातून प्रेमकहाणी कशी फुलते, सॅमसन चं एक गुपित अचानक कसं बाहेर येतं; आणि त्या गुपितामुळे प्रेम पुन्हा कोमेजतं का? हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला कादंबरी वाचावी लागेल.
काही पाने उदाहरणादाखल
बेयाचे वडील तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतानाचा संवाद
बेया आणि सॅमसन चा संवाद .. एकमेकांपासून थोडं लपवत, थोडं सांगत, थोडं विचारत चालणारं बोलणं
“ते दोघे भेटले, एकमेकांशी ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं” अशीच ही टिपिकल प्रेम कहाणी असली तरी भारतीय वाचकांसाठी थोडी वेगळी वाटेल. ह्याचं कारण ह्या कादंबरीत घडणाऱ्या घटना भारतीय समाजव्यवस्थेत आणि कुटुंब व्यवस्थेत इतक्या सहजपणे घडणं शक्य नाही. लग्नाआधी होणारं मूल वाढवणं; ते पण लग्न न करता त्या पुरुषाकडून बालसंगोपनाचे पैसे घेऊन… एखादी बाई मेल्यावर तिच्या पोरक्या मुलीची चौकशी करायला नातेवाईक, शेजारीपाजारी, समाजसेवी संस्था कोणी येत नाही. किती भयाण एकटेपण आहे ह्या समाजात. एक महिना सुट्टीवर गेलेल्या मुलीला तिची बहीण लगेच “बॉयफ्रेंड” बनवायला सांगते; “महिनाभर तर महिनाभर कर की एन्जॉय !!”. मुलींची आई त्यांना स्पष्टपणे विचारते; “तुम्ही गर्भनिरोधनाचे उपचार केले आहेत ना .. म्हणजे तुम्ही काही करायला मोकळ्या”. ज्याला बॉयफ्रेंड “करायचं” आहे तो दुसऱ्या मुलीशी लगट करतोय; पण काही हरकत नाही कारण दुसरी मुलगी दोन दिवसांनी बाहेरगावीच जाणार आहे. मग तो “अव्हेलेबल”च आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. ह्याच लेखिकेच्या “इट एन्ड्स विथ अस” कादंबरीत सुद्धा असेच अमेरिकन कुटुंब व्यवस्थेच्या थोड्या वेगळ्या समस्येचं दर्शन घडलं होतं. त्यामुळे हे पुस्तक वाचताना मूळ कथेपेक्षा ही सामाजिक निरीक्षणं वाचायची मला जास्त उत्सुकता वाटली.
पुस्तक वाचताना खूप उत्सुकता लागून राहत नाही. अर्धं पुस्तक “बेया” च्या निराधारपणाचे व त्यातून स्वभावात आलेल्या काडवटपणाचे कंगोरे रंगवण्यात गेलं आहे. तो भाग जरा जास्तच ताणला गेलाय. त्यामानाने सॅमसन चं गुपित तितकं ठोसपणे पटण्यासारखं मांडलं नाहीये. तो भाग मी पटापट वाचून उरकला.
तुम्हाला प्रेमकथा आवडत असतील तर वाचून बघा.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर प्रेमकथा किंवा भावनाप्रधान पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- अमृतवेल (Amrutvel) लेखक – वि.स. खांडेकर (V. S. Khandekar)
- काळेकरडे स्ट्रोक्स (Kalekarde strokes) / औदूंबर (ऑडिओ बुक) (Audumbar) – प्रणव सखदेव (Pranav Sakhadev)
- गोल्पे विभोर (Golpe Vibhor) – बाणी बसू (Bani Basu) अनुवादक – सुमती जोशी (Sumati Joshi)
- चंद्रमुखी (Chandramukhi) – विश्वास पाटील (Vishwas Patil)
- डी लॉंगलेग्ज (Daddy LongLegs ) – जीन वेब्स्टर (Jean Webster) – अनुवादिका – सरोज देशपांडे
- पाडस (padas) – मार्जोरी किनन रॉलिंग्ज (Marjorie Kinnan Rawlings) – अनुवाद – राम पटवर्धन
- मृत्युंजय (Mrutyunjay) – शिवाजी सावंत (Shivaji Sawant)
- रारंग ढांग (rarang dhang) – प्रभाकर पेंढारकर (Prabhakar Pendharkar)
- हिज डे (His Day) – स्वाती चांदोरकर (Swati Chandorkar)
- Chowringhi (चौरिंघी ) – Sankar (शंकर) अनुवाद Arunava Sinha (अरुणव सिन्हा)
- The guardian angels (द गार्डियन अँजल्स) लेखक – Rohit Gore (रोहित गोरे)
- Half Girlfriend हाफ गर्लफ्रेंड – Chetan Bhagat (चेतन भगत)
- His Forbidden passion (हीज फॉरबिडन पॅशन ) – Ann Mather (अॅन मॅदर)
- It ends with us (इट एन्ड्स विथ अस) – Colleen Hoover (कॉलिन हूवर)
- When only love remains (व्हेन ओन्ली लव्ह रिमेन्स ) – Durjoy Dataa (दुर्जोय दत्ता)
- The bridges of Madison county (द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी) लेखक – Robert James Waller (रॉबर्ट जेम्स वॉलर)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या तीनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe