

पुस्तक – रती महारथी (Rati Maharathi)
लेखक – डॉ. शरद वर्दे (Dr. Sharad Varde)
भाषा – मराठी
पाने – २६३
प्रकाशन – मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस. मार्च २०२४
छापील किंमत – रु. ३५०/-
ISBN – 978-93-93528-41-4
शरद वर्दे हे माझे आवडते लेखक. ह्यांची “राशा”, “झुळूक अमेरिकन तोऱ्याची”, “फिरंगढांग”, “बोलगप्पा” ही पुस्तकं वाचली होती फार आवडली होती. त्यामुळे वाचनालयात त्यांचं नवीन प्रकाशित पुस्तक दिसल्यावर लगेच घेतले. ह्या पुस्तकाने सुद्धा आधीच्या पुस्तकांप्रमाणे वाचनानंद दिला.
(ह्या आधीच्या पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे पुढील लिंकवर वाचू शकाल
“झुळूक अमेरिकन तोऱ्याची”
https://learnmarathiwithkaushik.com/courses/jhuluk-amerikan-toryachi/
“फिरंगढांग”
https://learnmarathiwithkaushik.com/courses/phirangdhang/
“राशा”
https://learnmarathiwithkaushik.com/courses/rasha/
“बोलगप्पा”
https://learnmarathiwithkaushik.com/courses/bolgappa/
)
कामाच्या निमित्ताने लेखक देशोदेशी फिरतात, राहतात, परदेशी लोकांना भेटतात. अनेक परदेशी लोकांबरोबर बरेच दिवस काम करायची संधी मिळते. तर काही वेळा सामान्य लोकांशीही ओळख होऊन गप्पा मारल्या जातात. ह्या भेटीगाठींतून अनेक वल्ली व्यक्तिमत्त्व समोर येतात. अशा बऱ्याच वल्लींशी ओळख लेखक आपल्याला करून देतात. लेखकाने निवडलेल्या बहुतेक व्यक्तिरेखा ह्या फक्त वेगळ्या स्वभावाच्या, वेगळ्या पिंडाच्या आहेत म्हणून निवडलेल्या नाहीत तर त्या व्यक्तीच्या तशा वागण्यामागे तिच्या समाजाची, देशाची संस्कृती, इतिहास, भूगोल सुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळे ही व्यक्तिचित्रणे असली तरी त्यातून फक्त एक व्यक्ती नाही तर एक अनोळखी संस्कृती, विचारपद्धती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.
एकेका प्रकरणाबद्दल सांगतो
१) सिनियर परी आणि ज्यूनियर ताई
लेखक अमेरिकेत मुलीच्या घरी राहायला गेले होते. त्या भाड्याच्या घरात तिच्याबरोबर अजून एक बल्गेरियाची तरुणी आणि तिची आई राहत होती. तरुणी कॉलेजला जाणारी आणि मोकळंढाकळं वागणारी. तर तिची आई तिच्याहून स्वतःला नीटनेटकी, आकर्षक ठेवणारी, मधाळ बोलणारी. लेखकाची मुलगी आणि त्यांची घरमालकीण सुद्धा म्हणते ह्या बाईपासून जरा सावध राहा. ती पुरुषांना आदी लावते असं वाटतंय. तीच ही “सिनियर परी”. इतकं सांगूनही लेखक आणि “सिनियर परी” ह्यांची ओळख होतेच, गप्पा होतात. आणि त्यातून उलगडतं की “सिनियर परी” अशी का वागते. बल्गेरियातली विवाहसंस्कृती आणि कुटुंबव्यवस्था बघता हे वागणं किती स्वाभाविक आहे. आपल्यापेक्षा वेगळी पाश्चात्य संस्कृती असं म्हणतो. पण त्यातलाही हा उपप्रकार अचंबित करणारा आहे.
२) गुप्त हार
एक अमेरिकन पाहुणा लेखकाला एका प्रवासात भेटला. त्याचं नाव केविन. व्यवसायानिमित्त जागोजागी भटकंती करणारा, लोकांचं निरीक्षण करून त्यांच्या हावभावातून बोलीतून त्यांच्या मनाचा वेध घेणारा – मनकवडा. आपल्या वागण्याने लेखकावर छाप पडलीच आणि योगायोगाने दोघांच्या कंपन्यांचं कामही जुळलं. प्रत्येक भेटीतून केविनबद्दल थोडं थोडं कळत होतं. त्याच्या घरच्या लोकांसाठी भेटी देण्याइतपत मैत्री झाली. आणि एकदा थेट त्याच्या अमेरिकन घरी जायला मिळालं. आणि मग कळलं मानकवड्या केविनच्या मनातलं दुःख !
३) ओ मारिया
प्रकरणाची सुरुवात होते अशी … “ई काडेक बुदी सेतीयावान आणि मारिया बुहा डेबोरा पासारिबू ह्यांना लग्न करायचं होतं. अर्थातच एकमेकांशी तुम्ही विचाराल की ही कुठली विचित्र नावं “… ही नावं आहेत इंडोनेशिया देशातल्या एका तरुण आणि तरुणीची. एक बाली बेटावरचा हिंदू. एक सुमात्रा बेटावरची ख्रिश्चन. आणि इंडोनेशिया मुस्लिम राष्ट्र. ह्या नावांचा अर्थ समजून घेताना आपण “तिथल्या हिंदू” धर्माबद्दल समजून घेतो. “आधी शरीरसंबंध , आणि गर्भधारणा झाली तर लग्नासाठी जोडपं अनुरूप” ह्या वेगळ्याच पद्धतीबद्दल. पुढे लेखक आणि त्या दोघांच्या गप्पांतून उलगडते इंडोनेशियातली त्रिधर्मी रचना. आणि ह्या अंतरधर्मिय विवाहाचं त्रांगडं !
बालीतल्या पर्यटन स्थळांबद्दल ऐकलं किंवा पाहिलं असेलच. पण “सामाजिक पर्यटन” करण्यासाठी हे प्रकरण वाचाच
४) ढोल्याशास्त्री
एका अरबी शेखला त्याच्या कंपनीतले लोक “ढोल्याशास्त्री” म्हणतात. शरीराने प्रचंड लठ्ठ “ढोल्या” आणि पण “शास्त्री” का बरं ? भरपूर वाचणारा आणि भरपूर बोलणाऱ्या ह्या वैशिष्टयपूर्ण शेखाच्या गमती
५) रोझी
बसमधल्या सहप्रवासाशी झालेल्या गप्पा आहेत ह्या. एक बडबडकरणारी, भोचक म्हातारी. गप्पा सहज जातात माझ्याघरी कोण, तुझ्या घरी कोण ; ह्या वळणावर. ती सांगते की … मुलीच्या मुलांना भेटायला जाते आहे. पाच नातवंडं आहेत. – एक तिची आणि तिच्या नवऱ्याची, दोन तिची पहिल्या नवऱ्याची, एक दुसऱ्या नवऱ्याची पहिल्या लग्नाची आणि सर्वात मोठी मुलगी तिचीच पण “अशीच” झालेली. हे सगळं इथे कसं स्वीकारलं जातं अमेरिका कशी मोकळ्याढाकळ्या स्वभावाची, भारत कसा मागास अशा टिप्पण्या. मग लेखकही भारताची बाजू मांडतो. चर्चा होत राहते. भांडण नाही. पण ह्या सगळ्याचा शेवट कसा होईल ?
६) सेन आणि नॉनसेन्स
स्वीडन मध्ये राहणाऱ्या बंगाली कुटुंबाची ही कहाणी. दोन बंगाली बंधू. एकाची बायको स्थानिक स्वीडिश बायको. तर दुसऱ्याची बंगाली. त्यातून दोन भिन्न संस्कृतींची सरमिसळ होणं , विरोधाभास दिसणं स्वाभाविकच. स्वीडिश लोक म्हणजे कमी बोलणारे, दुसऱ्याचे स्वातंत्र्य जपणारे, शिस्तप्रिय. भारताच्या बरेचसे विरुद्ध. पण स्वीडिश बाईला भारतातली कुटुंबव्यवस्था, उत्सवी वातावरण आवडतंय तर बंगाली बाईला ह्या सगळ्याचा तिटकारा. आपलं भारतीयत्व सोडून – स्वीडिश – होण्याचा तिचा प्रयत्न. पुरुष स्वीडनला राहून “जाज्वल्य भारतीयपणा” जपणारे. “पिकतं तिथे विकत नाही” चा अनुभव वाचणं मजेशीर आणि उद्बोधकही आहे.
७) इव्हिनिंग इन पॅरिस
“स्त्रीवादी” किंबहुना “पुरुषद्वेष्ट्या” स्त्री अधिकाऱ्याशी व्यावसायिक बैठका करण्याचा अनुभव
८) कॅबी
लेखक अमेरिकेत गेला असता तिथला कॅब चालवणारा वाटत होता भारतीय. पण बोलता बोलता तोच म्हणाला की तो बेकायदारित्या अमेरिकेत आला. त्यामुळे अशा माणसाच्या गाडीत बसणं धोकादायक. लेखकाने त्याला टाळायचा प्रयत्न केला तरी पुन्हा पुन्हा तोच प्रवासासाठी यायचा. प्रत्येक भेटीतून त्याच्याबद्दल थोडं थोडं कळत होतं. एकदा लेखकाने थोडी दारू पाजून बोलतं करायचा प्रयत्न केला. त्यातून मालवाहू जहाजातून, धोकादाकय रित्या केलेला प्रवास त्याने सांगितला. अमेरिकेत कसा राहण्याचा परवाना मिळवला ते सांगितलं. आणि … बऱ्याच वर्षांनी पुन्हा गेल्यावर बरंच काही धक्कादायक कळलं.
९) मिस लेबनॉन
लेबनॉन देशातल्या सुंदरीचा आधी तोरा , मग पुरुषांपासून सावध राहायची वृत्ती आणि मग अनपेक्षित फसवणूक
१०) शिकार
कंपनीतल्या व्यवस्थापनात बदल झाल्यामुळे एक नवीन ब्रिटिश अधिकारी नेमला गेला. भारतात आल्यावर त्याच्या कार्यशैलीचा फटका लोकांना बसायला लागला. दोन सहकाऱ्यांमध्ये अविश्वास निर्माण करून, स्पर्धा निर्माण करून “फोडा आणि राज्य करा”ची अंमलबजावणी चक्क कंपनीतच व्हायला लागली. राज्यकर्त्या ब्रिटिशांना “भारत छोडो” म्हणता येत होतं, “बॉस”ला कसं म्हणणार ? पण लेखकाच्या सहकाऱ्याने ह्या बॉसची माहिती, इतिहास शोधून काढला. आणि तो वापरून “गोळी” न घालता साहेबाला ‘फुटाची गोळी” दिली.
११) नशीबवान
ही सुद्धा एका अमेरिकेत बेकायदा घुसलेल्या शरणार्थीची कहाणी आहे. लेखकाच्या घरी काम करणारी मोलकरीण एल साल्वाडोर देशातून बेकायदेशीररित्या अमेरिकेत आली आहे. त्या देशातली गुन्हेगारी, अमानुष वातावरण, मेक्सिकोमार्गे चालत प्रवास, त्यात झालेले अत्याचार, अमेरीकेत स्वतःची मूळ ओळख उघड होणार नाही असं राहायला लागणं, मागे राहिलेल्या नातेवाईकांच्या आठवणींनी व्याकुळ होणं हे सगळं तिच्या बोलण्यातून आपल्यासमोर येतं.
आता काही पाने उदाहरणादाखल
मनोगत

चौथ्या लग्नाच्या गडबडीत असणारी “सिनियर परी”


अमेरिकेत बेकायदा घुसलेल्या टॅक्सी चालकाने नागरिकत्त्व कसं मिळवलं


“शिकार” प्रकरणातल्या ब्रिटिश अधिकाऱ्याला लक्षात आलं की मीटिंग मध्ये लोक हिंदीत काहीतरी कुजबुजतात. त्याचे अर्थ विचारल्यावर लेखकाची उडालेली तारांबळ
तर अशीही वैविध्यपूर्ण प्रकरणं जगाची सफर घडवून आणतात. ह्यातले विषय आणि माहिती महत्त्वाची आहेच पण लेखकाच्या विनोदी, शाब्दिक कोट्यांच्या शैलीने ती हलकीफुलकी होते. ज्ञानरंजक (Edu-tainment) असं हे पुस्तक आहे. लेखकाच्या मिश्किल टिप्पण्या, परदेशी पाहुण्याला शालजोडीतले हाणण्याचे किस्से किंवा कधी झालेली फजिती हे सगळं वाचताना पुस्तक खाली ठेववत नाही. तुम्हीही लवकरात लवकर पुस्तक हाती घ्या.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर प्रवास वर्णनांची , प्रवासावर आधारित पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती (End of the world Bhatakanti) – जयप्रकाश प्रधान (Jayprakash Pradhan)
- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)-प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
- गेशा ऑफ गिओन(Geisha of Gion) – मिनेको इवासाकी(Mineko Iwasaki) (अनुवाद : अनुराधा पुनर्वसु)
- घर सैनिकाचे (Ghar Sainikache)- डॉ. नीलिमा निशाणदार (Dr. Neelima Nishandar)
- चिनीमाती (Chinimati) – मीना प्रभु (Meena Prabhu)
- जंगलांतील दिवस (jangalantil divas) – व्यंकटेश माडगूळकर (Vyankatesh Madgulkar)
- झुळूक अमेरिकन तोऱ्याची ( Jhuluk Amerikan toryachi) – शरद वर्दे (Sharad Varde)
- झांझिबारी मसाला (Zanzibari Masala) – उमेश कदम (Umesh Kadam)
- नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा (Narmada Parikrama Ek Anandayatra) – उदयन् आचार्य (Udayan Acharya)
- नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar) – केनेथ अँडरसन Kenneth Anderson अनुवादक – संजय बापट (Sanjay Bapat)
- निसर्गपुत्र (Nisargaputra) – लायल वॉटसन (Lyall Watson) अनुवाद – निरंजन घाटे (Niranjan Ghate)
- पाचूचे बेट (Pachuche Bet) – हर्मन मेलव्हिल (Herman Melville) – अनुवाद – भानू शिरधनकर (Bhanu Shirdhankar)
- फिरंगढंग (phirangdhang)-डॉ. शरद वर्दे (Dr. Sharad Varde)
- बोटीवरून (botivarun)-नितीन लाळे (Nitin Lale)
- बुद्धायन आणि इतर प्रवास (Buddhayan Ani itar pravas) – समीर झांट्ये (Sameer Zantye)
- मंदिर कसे पहावे (Mandir kase pahave) – गो बं देगलूरकर (G. B. Deglurkar)
- मस्रा (Masra) – बेन्यामिन (Benyamin) अनुवादक – ए. आर. नायर / जे.ए. थेरगांवकर (A. R. Nair, J.A.Therganonkar)
- रुळानुबंध (Rulanubandh) – गणेश मनोहर कुलकर्णी (Ganesh Manohar Kulkarni)
- लडाख : एक उत्तुंग स्वप्न (Ladakh : Ek Uttunga Swapna) – सागर रायकर (Sagar Raykar)
- वाट तिबेटची (Vat Tibetachi) – मीना प्रभु (Meena Prabhu)
- विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस (Vivekananda Kendratil Mantaralele Divas) – दिलीप महाजन (Dilip Mahajan)
- शिल्पकथा (Shilpakatha) – पुरुषोत्तम विठ्ठल लेले (Purushottam Viththal Lele)
- सोन्याच्या धुराचे ठसके (sonyachya dhurache thasake) – डॉ. उज्ज्वला दळवी (Dr. Ujjwala Dalvi)
- दिशा आणि वाटा : काही प्रवास नोंदी (Disha ani vata : Kahi pravasanondi) – डॉक्टर आशुतोष जावडेकर (Dr. Ashutosh Javdekar)
- नागालँडच्या अंतरंगात (Nagalandchya Antarangat) – अर्चना जगदीश (Archana Jagadeesh)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link


