पुस्तक – महानगर (Mahanagar)
लेखक – मिलिंद बोकील (Milind Bokil)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १४७
प्रकाशन – मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,एप्रिल २०२५
छापील किंमत – २५०/-
ISBN – 978-93-93528-84-1

मिलिंद बोकील यांच्या सात दीर्घ कथांचा हा संग्रह आहे. पूर्वी वेगवेगळ्या नियतकालिकांत १९८१ पासून २०२३ पर्यंत प्रकाशित झालेल्या या कथा आहेत. प्रत्येक गोष्टीबद्दल थोडक्यात सांगतो
पुन्हा सूर्य पुन्हा प्रकाश – एका कारखान्यातल्या रसायन साठवणूक करणाऱ्या प्रचंड मोठ्या टाकीमध्ये तिथला एक कर्मचारी उतरला आहे. टाकीची तांत्रिक पाहणी करणे हे त्याचे काम. या कामात त्याच्याबरोबर नेहमी कोणीतरी मदतनीस असतो. पण आज घाईघाईने तो एकटाच त्या टाकीत उतरलाय. मात्र घात झाला!! अचानक कोणीतरी टाकीचं झाकण बंद केलं. पूर्ण ग्रुप अंधारात तो आता त्या टाकीत अडकला आहे. बाहेर कोणालाच माहिती नाही. किती ओरडलं तरी त्या खोल जाड टाकीच्या बाहेर आवाज जात नाही. तो असाच अडकून राहणार का टाकीत? रसायन भरायला सुरुवात झाली तर काय होईल? झाकण बंद झाल्या झाल्या एका क्षणात बाहेरच्या प्रकाशमय जगातून तो पूर्ण अंधाऱ्या जगात कोंडला गेला आहे. एका क्षणात बाहेरच्या प्रत्येक गोष्टीची जणू अपूर्वाई वाटावी अशी भयंकर अवस्था झाली आहे. आता तो काय करेल? तो कसा सुटेल? त्याला पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश दिसेल का? याची ही अतिशय उत्कंठावर्धक अंगावर शहारे आणणारी कथा.

एक रिकामे शून्य – या कथेतला नायक वेगळ्या परिस्थितीत अडकला आहे. नायक हॉस्पिटल मधल्या वैद्यकीय उपकरणांची देखभाल दुरुस्ती करणारा तंत्रज्ञ आहे. त्याला एका हॉस्पिटलमध्ये तातडीने मशीन रिपेअर करायला बोलावलं आहे. कारण ते मशीन वापरून एक ऑपरेशन करायचं आहे. रुग्णाच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. ते उपकरण दुरुस्त झालं नाही तर त्याशिवाय शस्त्रक्रिया करणे खूप धोक्याचे आहे. आता काय होणार? यंत्र दुरुस्त होणार का? का त्या आधीच शस्त्रक्रिया करावी लागेल? इतकी धडपड करून शस्त्रक्रिया झाल्याचा फायदा होईल होईल का?
मशीन दुरुस्त करण्याचे नायकाचे प्रयत्न, हे काम आपण का अंगावर घेतलं हा सतत स्वतःलाच पडणारा प्रश्न, वेळ निघून चालली आहे म्हणून डॉक्टरांची होणारी धावपळ, रुग्णाच्या जीवनाची करुणा भाकणारे नातेवाईक हे सगळे चित्र लेखकाने अतिशय प्रत्ययकारी चित्र उभं केलं आहे. वाचता वाचता आपणही त्या चित्राचा एक भाग होऊन जातो.

लोखंड आणि घोडा – एक सुखवस्तू मध्यमवर्गीय जोडपं. एकमेकांचे गुण दोष सांभाळून, समजून घेत ते संसार करत आहेत. पण पती-पत्नीमध्ये अनपेक्षित पणे तिसरा येतो. नवऱ्याला कळणार नाही अशा बेताने सुरू झालेले संबंध हळूहळू वेगळे रूप घेतात. नायिकेला हे कळत असतं की आपण नवऱ्याला फसवतोय. पण तरीही या संबंधांची गोडी तिला वाटत असते. ते संबंध अजून गंभीर रूप घेऊ लागतात. या संबंधातून आपल्याला काय हवं आहे हे समजून घेता घेता तिला स्वतःची, तिच्या नवऱ्याची प्रियकराची आणि एकूणच आपल्या संसाराची काही वेगळीच कल्पना येते.
आधीच्या कथांप्रमाणे नायिका एखाद्या विशिष्ट ठिकाणी अडकलेली नाही. पण एका अदृश्य भावनिक वर्तुळात अडकली आहे. तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या भावभावनांचे हिंदोळे आपल्यालाही वाचनात झुलवतात.

रणभूमी – यातही एक सुखवस्तू जोडपं आहे. यातल्या बाईचं वागणं फार लहरी आहे. कधी उच्च शिक्षण घेण्याचा नाद तर कधी नाटकात काम करण्याचा नाद असं काहीतरी. इतका नाद की घरदार, मुलंबाळं विसरून त्याच गोष्टीच्या मागे. नवऱ्याला असं जाणवतं की त्या नादाबरोबरच तिथे संपर्कात येणाऱ्या पुरुषांच्या मागे ती विनाकारण वाहवत जाते आहे. तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यासारखा नसला तरी इतर पुरुषांच्या वृत्ती बद्दल मात्र त्याला संशय येत असतो. अशा प्रत्येक घसरणीच्या वेळी नवरा तिला कसा सावरतो आणि बायको त्याच्यासमोर नवनवीन आव्हान कशी ठेवते त्याची ही गोष्ट.

स्मरण – एका स्मशानात घडणारी ही गोष्ट आहे. एका अंत्यविधीला आलेल्या लोकांचा हा पूर्ण संवाद आहे. त्या क्षणी तिथे प्रत्यक्ष काहीच घडत नाही. ते लोक एकमेकांशी फक्त गप्पा मारत आहेत. पण त्या संवादातून ते चार जण कोण आहेत, अंत्यविधी कोणाचा आहे, त्या चार जणांचा आणि मृत व्यक्तीचा काय संबंध, त्या मृतव्यक्तीने त्यांच्या पूर्वायुष्यावर कसा परिणाम केला हे हळूहळू उलगडत जातं. ही कथा थोडी आर्ट फिल्म सारखी आहे. संवादातून तुकडे जोडत जोडत काही एक धूसर चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. इतर गोष्टींएवढी ही मला भावली नाही.

कॅमेरा – कोरोना काळात घरी बेकार बसलेला एक छायाचित्रकार काहीतरी काम करायचं म्हणून एक काम स्वीकारतो. ते काम असतं अश्लील चित्रफितीच्या चित्रीकरणाचं. पॉर्न फिल्मचं शूटिंग. अशा शूटिंगचा हा त्याचा पहिलाच अनुभव (कदाचित पुस्तकाच्या वाचकांचाही हा पहिलाच अनुभव असेल !) त्यामुळे अशा पद्धतीच्या फिल्मचं शूटिंग कसं होतं याचा आखो देखा हाल आपल्याला या कथेत वाचायला मिळतो. चित्रफितीत काम करणारे लोक शृंगाराचा अभिनय कसा करतात, दिग्दर्शक त्यांना किती सहजपणे त्यांना सूचना देतो, हसत खेळत कसं काम होतं, त्यातून तिथे काम करणाऱ्या माणसांचे वेगवेगळे रंग हे सगळं दिसतं. इथे सुद्धा “पब्लिक डिमांड” काय असते हे दिग्दर्शकाला लक्षात घ्यावं लागतं हे वाचन मजेशीर आहे. परिस्थितीच्या नाईलाजापोटी अशा चित्रफितीत लोकांना काम करावं लागतं ती निकड अधोरेखित होते.
लेखक तुम्हाला थेट त्या चित्रीकरणाच्या सेटवर दिग्दर्शकाच्या बाजूला खुर्चीवरच बसवतो !!

काही पाने उदाहरणे दाखल
रसायनाच्या टाकीत अडकलेल्या नायकाची अवस्था.


लहर आली की वाहत जाणाऱ्या रंजनाची अवस्था.


अश्लील चित्रपटाच्या चित्रीकरणातील एक प्रसंग.

अशा ह्या विविध विषयांवरच्या पण माणसाच्या मनात चालू असणाऱ्या संघर्षाच्या आहेत. परिस्थितीशी संघर्ष, स्वतःच्या वासनांशी संघर्ष, स्वतःच्या भावनांशी किंवा आपल्या जवळच्या माणसाच्या मानसिकतेशी. त्यामुळे सर्व कथा गंभीर आहेत पण रटाळ अजिबात नाहीत. जितक्या उत्कंठावर्धक आहेत तितक्याच त्या विचार प्रवृत्त करणाऱ्या देखील आहेत. माणसांच्या नाना रंगछटा दाखवणाऱ्या आहेत.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर कथासंग्रहांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link