पुस्तक – प्रीत ही बावरी (Preet hi baawari)
लेखक – अविनाश गडवे (Avinash Gadwe)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १२२
प्रकाशन – युगंधरा प्रकाशन नोव्हेंबर २०२४
छापील किंमत – २००/- रु.
ISBN – 978-81-967821-5-3

मी “पुस्तकप्रेमी” या साहित्यविषयक व्हॉट्सॲप समूहाचा सदस्य आहे. त्याच समूहातील कथालेखक, कवी, उत्तम सूत्रसंचालक, खुसखुशीत बोलण्याने सर्वांना हसवणारे असे लोभस व्यक्तिमत्व म्हणजे अविनाश गडवे. ह्या वर्षीच्या(२०२५) जून महिन्यात कराडला झालेल्या पुस्तकप्रेमी समूहाच्या संमेलनात अविनाश गडवे यांनी मला त्यांचा हा कथासंग्रह भेट दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

हा त्यांचा दुसरा कथासंग्रह. कथासंग्रहातल्या गोष्टी या प्रेमकथा आहेत. यशस्वीतप्रेम कथा म्हटलं की; मुलगा-मुलगी एकमेकांना भेटले, एकमेकांबद्दल आकर्षण वाटलं, जवळीक वाढली, प्रेमात रूपांतर झालं, लग्न झालं आणि त्यानंतर ते सुखाने नांदू लागले. पण प्रत्येक गोष्ट तितकी सरळ नसते. किंवा ती तितकी सरळ झाली तर त्यात गोष्ट म्हणून सांगण्यासारखं काही विशेष असत नाही. “कहानी में ट्विस्ट” आला की मगच ते सांगावसं वाटतं. अविनाश यांच्या कथा या अशाच “कहाणीत ट्विस्ट” असणाऱ्या आहेत.

भेट,ओळख, प्रेम, लग्न, संसार या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही तरी वेगळं घडू शकतं ज्यामुळे या प्रवासातला पुढचा टप्पा खुंटतो, कधी पुढचा टप्पा फार दूर जातो, तर कधी पुढच्या टप्प्यावरून पुन्हा मागे यावसं वाटतं. अशा कितीतरी शक्यतांचा विचार अविनाशजींनी या कथांमध्ये केला आहे. इंजीनियरिंग च्या भाषेत बोलायचं तर बरीच “परम्युटेशन-कॉम्बिनेशन” ट्राय करून नवनवीन “सिनॅरिओ” त्यांनी आपल्यापुढे मांडले आहेत.

एकूण 25 कथा आहेत त्यामुळे प्रत्येक कथेबद्दल सांगणं कठीण आहे. त्यातून भावी वाचकाचा रसभंगही होऊ शकतो म्हणून साधारण गोषवारा देतो. आणि तीन-चार गोष्टींबद्दल सांगतो.

“असेच असावे हास्य ओठी ” – निराधार महिलांच्या आश्रमात राहणाऱ्या एका तरुणीच्या प्रेमात त्या आश्रमाच्या संचालिकेचा मुलगा पडला आहे. मुलीचे गुण बघून मनापासून तिच्याबद्दल प्रेम वाटत आहे. त्याचं प्रेम तो कसा व्यक्त करेल ? ती ते स्वीकारेल का? समाज काय म्हणेल?

“गिफ्ट”- एका कॉलेजकुमाराला त्याची वर्गमैत्र आवडते आहे. ती खूप साधी, समंजस, लाघवी आहे आता तिच्या वाढदिवसाला इतरांपेक्षा वेगळं काय गिफ्ट द्यावं हा प्रश्न त्याला पडला आहे. त्याचे आजोबा त्याला एक वस्तू सुचवतात. वस्तू भले साधी आणि जुन्या वळणाची. पण म्हणूनच इतर मित्रांपेक्षा वेगळी आणि अनोखी. त्या प्रसंगाची गंमत.

पुस्तकात बऱ्याच विरह कथा आहेत म्हणजे परिस्थितीमुळे प्रेमाचे रूपांतर लग्नात, संसारात होऊ शकले नाही किंवा अपघात, आजारपण यामुळे जोडीदाराचे निधन झाले .अशावेळी साध्या साध्या गोष्टीतून जोडीदाराची आठवण येते ते भावपूर्ण प्रसंग लेखकाने टिपले आहेत.

इतर बऱ्याच कथा हे “जुनं प्रेम पुन्हा परत येतं” अशा पद्धतीच्या आहेत. नायकनायिकेचे लग्न झालं असेल तर जुना प्रियकर परत भेटल्यावर मनात होणारी खळबळ; काही वेळा नायक/नायिका का अविवाहित राहून जुन्या प्रेमाच्या आठवणीवर जगत आहेत. अशावेळी अनपेक्षितरित्या प्रिय व्यक्ती पुन्हा भेटते. तर काही वेळा जाणूनबुजून लग्न न करून वेगळे राहत असतानाही पुन्हा पुन्हा गाठ पडणे अशा स्वरूपाच्या आहेत. प्रत्येक वेळी उठणारे भावनांचे कल्लोळ लेखकाने एक दोन प्रसंगात आणि थोडक्यात शब्दात आपल्यासमोर चित्रित केले आहेत. “मधु”, “सोन्याचे बिस्किट”, “रानफूल “, “संकेत मिलनाचा” या गोष्टी तशाआहेत.

“मधु” या कथेत असेच दोन मित्र एका लग्नसमारंभात एकमेकांसमोर येतात. नजरा नजर होऊनही नजर चुकवतात. शेवटी नायिका जी आता मध्यमवहीन बाई झाली आहे, तीच पुढाकार घेऊन बोलते. सूचक शब्दांतून आपण एकत्र यायला पाहिजे होतं पण आलो नाही हे व्यक्त होतं आणि तरीही निरोप घेऊन दोघेजण परत जातात.

“आई”, “पैंजण”, “सावली” या कथा अजून थोड्या वेगळ्या आहेत. नायकनायिकेच्या यांच्या आई-वडिलांच्या भूतकाळामुळे त्यांच्या नात्यावर कसा परिणाम होतो हे दाखवणाऱ्या गोष्टी आहेत. थरारक आणि अनपेक्षित प्रसंगांची गुंफण त्यात आहे.

आता काही पाने उदाहरणादाखल वाचा म्हणजे निवेदनशैलीची कल्पना येईल.
अनुक्रमणिका

“असेच पाहिजे असेच पाहिजे” गोष्ट. बायकोमुलं सोडून गेल्यावर त्यांचं महत्त्व नायकाला कळतं. एकटेपणा जाणवतो आणि पिंजऱ्यातल्या पोपटाच्या एकटेपणाची अनुभूती येते.


“मधू” – जुनं प्रेम लग्नाच्या जेवणात अचानक समोर येत तेव्हा

“स्वप्न” ही दोन पानीच कथा पण प्रत्येक परिच्छेदात गोष्ट इतके झोके घेते की शेवटी आपणही म्हणतो, “हुश्श ! झालं बरं एकदाचं !!”.

एका कथेत लेखकाने शेवट वाचकांवर सोडला आहे. ते वाचल्यावर असं मनात आलं की ह्यातल्या बऱ्याच पात्रांचं शेवटचं वागणं योग्य का अयोग्य असाही प्रश्न वाचकांना विचारता येईल. “विक्रम वेताळ” कथांसारखं आपापल्या स्वभावानुसार आपलं आकलन वेगळं.

ह्या सर्व लघुकथा आहेत. दोन-तीन पानाच्या. एखाद दुसरीच कथा जरा मोठी चारेक पानांची असेल. त्यामुळे कमीत कमी शब्दात परिस्थिती समजेल अशा पद्धतीने संवादांची निवेदनाची रचना आहे. एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीत फार झपाट्याने आपण जातो. पात्रांचं बोलणं हे साधं रोजच्या जगण्यातलं आहे. त्यात साहित्यिक तत्त्वज्ञानात्मक अशी शाब्दिक फुलोरा आणलेली वाक्ये नाहीत. त्यामुळे ती घटना आपल्या समोरच घडते आहे असं आपल्याला वाटतं आणि आपण गोष्ट पुढे पुढे उत्सुकतेने वाचत राहतो. बऱ्याच वेळा आपल्याला अनपेक्षित असे प्रसंग त्यात घडतात आणि एक नवीन सिनेमा आपल्यासमोर उभा राहतो.

लघुकथा असल्यामुळे गोष्ट वाचून लगेच संपते; पण ती गोष्ट मनात नक्की रेंगाळते. पुढच्या गोष्टीकडे वळण्याआधी आपण दोन मिनिटं वाचलेल्या गोष्टीवर विचार करतो. असं झालं तर खरंच काय होईल? त्या त्या व्यक्तीची मानसिक अवस्था कशी होईल? हा विचार येतो. मनातल्या मनात त्या लघुकथेचं दीर्घकथेत आणि पाच वाक्यातल्या संवादांचं दीर्घ मानसिक द्वंद्वात रूपांतर आपण करतो. अविनाशजींच्या कथेची ही जमेची बाजू आहे असं मला वाटतं. अविनाशजींच्या लेखणीतून त्या दीर्घकथा किंवा यातल्या काही कथाबीजांवर आधारित एक छान कादंबरी वाचायला मला नक्की आवडेल.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर कथासंग्रहांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link