पुस्तक – राक्षस आणि पोपटाची ॲडल्ट कथा (Rakshas ani popatachi adult katha)
लेखक – श्रीकांत बोजेवार (Shrikant Bojewar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १२३
प्रकाशन – रोहन प्रकाशन, ऑगस्ट २०२४
ISBN – 978-93-89458-32-9

काही महिन्यांपूर्वी श्रीकांत बोजेवार ह्यांची दोन पुस्तके घेतली होती. “क्ष क्षुल्लकची कहाणी” आणि “राक्षस आणि पोपटाची ॲडल्ट कथा” हे दोन कथा संग्रह. अद्भुतता (फँटसी) आणि वास्तव ह्यांचा मेळ साधत एका रंजक परिस्थतीत घेऊन जाणाऱ्या गोष्टी “क्ष क्षुल्लक..” मध्ये होत्या. मला ते पुस्तक खूप आवडले. विशेष म्हणजे त्याचे मी लिहिलेले परीक्षण लेखकालाही आवडले. महाराष्ट्र टाइम्स मध्ये ते प्रकाशितही झाले होते. ते तुम्ही ह्या लिंकवर वाचू शकाल https://learnmarathiwithkaushik.com/courses/ksha-kshullakachi-black-comedy/.
ते पुस्तक वाचल्यापासून दुसरे पुस्तक वाचायची उत्सुकता होती. पण लागोपाठ त्याच प्रकारची किंवा त्याच लेखकाची पुस्तके न वाचण्याच्या माझ्या सवयीमुळे हे पुस्तक मुद्दाम बाजूला ठेवले आणि थोड्या दिवसांनी वाचायला घेतले.

हे पुस्तक नऊ कथांचा संग्रह आहे. आशय, विषय, मांडणी वेगवेगळी आहे. म्हणून आधी प्रत्येक गोष्टीबद्दल थोडक्यात सांगतो.

राक्षस आणि पोपटाची ॲडल्ट कथा – एका मध्यमवयीन जोडप्याची ही गोष्ट आहे. नवरा म्हणतोय बायकोने माझ्या पायावर जोरात काठी मारली, मुद्दामून. बायको म्हणतेय मी झुरळ मारत होते ह्यांना चुकून लागली. इतके वर्ष ज्या बायकोला पुरुषी वर्चस्व दाखवत मुठीत ठेवली ती आज अशी जुमानत नाही बघून नवरा संतापलाय. कसला राग बायको काढत असेल? इतकी वर्ष दबून राहणारी बायको ह्या वयात अशी बंडखोर कशी झाली? गोष्ट पूर्ण वाचल्यावर कथेच्या नावाची गंमत अजून वाटेल.

शब्द – एक लेखक त्याच्या लॅपटॉपवर कथा लिहितो आहे. बरंच टाईप करून झालं आहे . पण अचानक पुढचा शब्द लिहिला तो आपोआप डिलीट झाला. पुन्हा लिहिला पुन्हा डिलीट. ही काय भुताटकी? तो शब्द योग्यच आहे त्यामुळे “ऑटो करेक्ट” ने तो चुकीचा ठरवायला नको. म्हणून शब्दकोशांत बघितला तर तो शब्द तिथेही नाही. त्याला माहिती असणारे अनेक शब्द कोशात पूर्वी दिसत होते आता तिथे जागा रिकाम्या. काय झालं शब्दाचं? भाषेचं बदलतं रूप सांगणारी अद्भुतरम्य गोष्ट आहे ही.

काळा गूळ आणि कावळा – एक नव्याने लग्न झालेलं जोडपं आहे. एकमेकांचा सहवास पुरेपूर उपभोगतायत. पण त्यांच्या खाजगी क्षणी कोणीतरी त्यांच्याकडे बघतंय असं बायकोला वाटायला लागतं. मग तिच्या लक्षात येतं की एक कावळा नेमका त्यावेळी आपल्या गॅलरी समोर बसतो आणि एकटक पाहत राहतो. तिची आई तिला तोडगा सांगते “काळा गूळ ठेव”. पण खरंच कावळा बघत असेल; का दुसरं कोणी? कोणाच्या अतृप्त इच्छा अपूर्ण असतील?

चेटकीणी – “चेटकीणी” म्हणजे घर संसारात राहून पण घराला हातभार म्हणून आपल्या शारीरिक आकर्षकतेच्या बळावरएखाद्या परपुरुषाला भुलवण्याची कला अवगत असणाऱ्या बायका.. ही कला ते आपल्या पुढच्या पिढीकडे कशा देतात त्याची ही गोष्ट.

झूओ – एका पुस्तकवेड्या माणसाकडचं एक पुस्तक अचानक नाहीसं होतं. पुस्तक होतं चिनी दंतकथेतील व्यक्तिरेखा “झूओ” बद्दलचं. हा झूओ म्हणे बुद्धिमान आणि रंगेल माणूस. त्याला सगळे ग्रंथ तोंडपाठ कसे होते, त्याने अनेक बायकांशी संबंध कसे ठेवले होते ह्याच्या लोककहाण्या प्रसिद्ध आहेत म्हणे. नेमकं तेच पुस्तक चोरीला गेलं. कोणी नेलं? नक्कीच मित्रांपैकी कोणी. म्हणून तो मित्रांकडे चौकशी करतो. मित्र नाही म्हणतात. पण त्याचा विश्वास बसत नाही. पुढे त्याहून अविश्वसनीय घटना घडते म्हणजे अनपेक्षितरित्या पुस्तक परत मिळतं. दंतकथा झालेल्या झूओ च्या पुस्तकाच्या बाबतीतही पुस्तक मिळणे, हरवणे, सापडणे च्या जणू नव्या दंतकथा अजूनही घडत आहेत.

एकांतभ्रम – मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात आपला डिजिटल ट्रॅक रेकॉर्ड, आपली स्वतःची शेअर करण्याची वृत्ती यामुळे आपल्याबद्दल माहिती वेगवेगळ्या ॲपकडे किंवा सिस्टीम हॅकर कडे जाऊ शकते. अशी माहिती वापर वापरून आपल्या अगदी मनाचा वेध घेणार ॲप निघालं तर ? खरा एकांत मिळणं आता कठीणच होणार की काय? अशी शक्यता दाखवणारी गोष्ट आहे.

संवाद एकांताशी – एका माणसाला एकटेपणा छळतोय . त्याला त्याच्या प्रेयसीची आठवण होते आहे. “नको हा एकांत” असं म्हणत असताना एकांतच जणू मूर्त स्वरूपात येऊन त्याच्याशी बोलायला लागला. एकांत माणसाला कधी आवडतो कधी नाही त्याचे काय फायदे काय तोटे अशी चर्चा त्यांच्यात रंगते. असे कल्पना रंजन करून लिहिलेली ही कथा आहे.

क…शो…ले – कथेच्या शोधात लेखक म्हणून “क…शो…ले”. बसच्या प्रवासात असताना एका लेखकाला एक चमकदार कल्पना सुचते. ती कुठे लिहून ठेवायची म्हणून कागद शोधत असतानाच नेमका त्याचा उतरण्याचा स्टॉप येतो आणि तो उतरतो. झालं ! त्या गडबडीत काही क्षणापूर्वी सुचलेली कल्पना त्याच्या डोक्यातून निघून जाते. त्याला काही केल्या त्या आठवत नाही. मग तो जातो मेंदू तज्ञ डॉक्टरांकडे. त्यांना म्हणतो, माझ्या मेंदूत बघा आणि ती कल्पना शोधून द्या. खरंच, माणसाच्या डोक्यात बघण्याची त्यातले चालू विचार, जमा झालेल्या आठवणी यंत्राच्या साहाय्याने काढायची सोय असती तर? मेंदूत डोकावून बघितल्यावर काय काय दिसेल? जुन्या आठवणी चाळवल्यावर काय होईल? या कल्पनेवर पुढच्या गमती घडतात.

एव्हरी एडिट इज नॉट अ लाय – चित्रपटामध्ये संकलनाचं (एडिटिंगचं) काम करणाऱ्या एका माणसाकडे अचानक एक व्यक्ती येते आणि म्हणते “सध्या शूटिंग चालू असलेल्या चित्रपटात मी एका दृश्यात काही सेकंदात दिसणार आहे कृपया संकलन करताना ते दृश्य कापून टाकू नका”. वरवर साधी वाटणारी मागणी आणि साधी वाटणारी ही व्यक्ती. पण दिग्दर्शकाशी बोलताना लक्षात येतं की हा माणूस काहीतरी काळी जादू करतो. संकलकालाही तसाच काही अनुभव येतो. म्हणून तो त्या व्यक्तीचा माग काढतो. एका छोट्या दृश्याचं इतकं का महत्व ? आणि त्यासाठी काळी जादू करण्यापर्यंत तो का गेला आहे याचं भावुक करणार कारण त्याला कळतं.

अशा या नऊ गोष्टी आहेत विषय वेगळे वेगळे आहेत. काही पाने उदाहरणादाखल वाचा.
“शब्द” हरवल्यावर काय झालं ??

“चेटकिणीं”चे संस्कार

पुस्तकाच्या नावात “ॲडल्ट कथा” असा उल्लेख आहे. ह्यातल्या गोष्टी “ॲडल्ट” गोष्टी नाहीत. काही गोष्टींचा गाभा स्त्रीपुरुष शरीरसंबंध ह्यावर आधारित आहे. पण इतर गोष्टींमध्ये त्याबद्दलची वाक्य, प्रसंग विनाकारण आली आहेत असं वाटलं. “झूओ” आणि “एकांतभ्रम” या गोष्टी छान रंगलेल्या असताना मध्येच थांबवल्या सारख्या वाटल्या (“क…शो…ले” गोष्टीसारखं झालं होतं की काय). “एकांताशी संवाद” म्हणजे ‘एकांत चांगला की वाईट’ असा निबंध संवादस्वरूपात लिहिल्यासारखा झाला आहे. “काळा गूळ..” आणि “चेटकिणी” या दोन गोष्टींमधले प्रसंग थोडे ओढूनताणून आणल्यासारखे वाटतात तरीही शेवटपर्यंत उत्सुकता आणि रंजकता टिकवून ठेवणाऱ्या आहेत.  “राक्षस..”, “शब्द”, “क…शो…ले”, “एव्हरी एडिट… ” ह्या चार गोष्टी भन्नाट आहेत.

काही गोष्टींमध्ये फॅन्टसी/अद्भुततेचा आधार घेतला आहे तर काही वास्तविक जीवनात घडू शकतील अशा घटना आहेत. लेखकाची शैली आणि कथेतल्या प्रसंगांचा वेग यामुळे आपण उत्सुकतेने पुढे पुढे वाचत राहतो. काही ठिकाणी हलका विनोद, थेट आणि नेमके संवाद, वेगवान घडामोडी ह्यामुळे गंभीर विषय अंगावर येत नाही. नवनवीन शक्यता आपल्याही डोक्यात येतात. कौटुंबिक, सामाजिक कथांपेक्षा वेगळ्या बाजाच्या कथा मराठीत वाचायला मिळाल्याचे समाधान नक्की मिळेल.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर कथासंग्रहांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link

 

Jaxx Wallet

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

jaxxwallet-liberty.com

Jaxx Wallet